“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 12:15 IST2026-04-22T12:15:42+5:302026-04-22T12:15:42+5:30
MNS Sandeep Deshpande News: मनसेच्या नवीन उपक्रमाबाबत संदीप देशपांडे यांनी माहिती दिली.

“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
MNS Sandeep Deshpande News: महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपनगरातील ज्या रिक्षा आहेत, त्यांच्यासाठी ‘मी मराठी बोलतो, मला मराठी समजते आणि माझ्या रिक्षात तुम्ही बसू शकता’, या नवीन उपक्रमाला सुरुवात करत आहोत. उपनगरातील रिक्षांवर स्टिकर लावण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील मराठी प्रेमी जनतेला आमचे आवाहन आहे की, ज्या रिक्षांवर असा स्टिकर दिसेल, त्यांनीच शक्यतो आपण प्रवास करावा. मला मराठी येत नाही, मी मराठी बोलणार नाही, असा माज करणारे जे लोक आहेत, त्यांना धडा शिकवायची ही योग्य वेळ आहे, असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना संपाला पाठिंबा देणार नाही. मराठी रिक्षाचालक या संपात सहभागी होणार नाहीत. रस्त्यावर रिक्षा चालू राहतील. जे अमराठी लोक आहेत त्यांनी हिंमत दाखवावी क्लॅशेस करायची. महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये सगळेच मराठी भाग आहे. सगळ्यांनी मराठी बोलावे. महाराष्ट्रात राहायचे असेल तर तेथील भाषा यायला हवी, असा आमचा आग्रह आहे आणि तो आधीपासूनच आहे. जर्मनी असेल किंवा परदेशातील अनेक देश आहेत, तेथील भाषा शिकल्याशिवाय जॉब मिळत नाही. तामिळनाडू येथे गेलात, तर तिथे तामिळ भाषा शिकावी लागते. गुजरातमध्ये गुजराती भाषेतच बोलतात. मग मुंबई आणि महाराष्ट्राने काय पाप केले? अशी विचारणा संदीप देशपांडे यांनी केली.
मराठी अनिवार्य असणे असा नियम आताचा नाही, खूप आधीचा
जर कुणाला मराठी शिकायची असेल, तर आम्ही शिकवू; पण, आमची पद्धत थोडी वेगळी आहे, अशी टोलेबाजी करत, मराठी अनिवार्य असणे असा नियम आताचा नाही, खूप आधीचा आहे. हा नियम केवळ महाराष्ट्रात नाही, तर सूरत, कर्नाटक, तामिळनाडू येथेही आहे. प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनाही स्थानिक भाषा शिकावी लागते. महाराष्ट्रात जे बाहेरील राज्यातून आएएस आणि आयपीएस अधिकारी येतात, ते मराठी भाषा शिकतात ना, पुण्यातील पंजाबी अधिकारी चांगले मराठी बोलतात. इथली भाषा मराठी असेल, तर ती तुम्हाला शिकायला नको का, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला.
दरम्यान, मोटार परिवहन विभागाच्या नियमांनुसार रिक्षाचालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य आहे. त्यामुळे फेरतपासणीदरम्यान चालकांना मराठी येते का, याचीही कसून पडताळणी केली जाणार आहे. मराठी बोलता न येणाऱ्या चालकांवर परवाना रद्द करण्यात येणार आहे. १ मेपासून सर्व परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा लिहिता व वाचता येणे बंधनकारक राहील. नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश देण्यात आले आहेत.