बालपणी वडिलांना गमावलं, परिस्थितीचा फायदा घेत नातेवाईकांनी केला छळ, स्वत: च्या हिंमतीवर बनली 'ती' सुपरस्टार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 17:45 IST2026-04-22T16:44:06+5:302026-04-22T17:45:06+5:30
ज्या काळात सिनेसृष्टीत एका चित्रपटाचं बजेट केवळ १५ ते २० हजार असायचं आणि तिकिटाची किंमत साधारण ३० पैसे होती, त्याकाळात एक सुपरस्टार गायक, अभिनेत्री होती जी एका गाण्यासाठी १ लाख रुपये आणि एका चित्रपटासाठी ५ लाख रुपये मानधन घ्यायची.

या अभिनेत्रीची त्या काळात इतकी क्रेझ होती की तिचे पोस्टर्स चाहते आपल्या रुममधील भिंतीवर लावत असत. या अभिनेत्री होत्या काननदेवी.बंगाली चित्रपटसृष्टीतून हिंदी चित्रपटसृष्टीत आलेल्या पहिल्या सुपरस्टार अशी त्यांची ओळख होती. मात्र, अभिनेत्री काननदेवी यांचा हा प्रवास फार काही सोपा नव्हता. संघर्ष जणू लहानपणापासूनच पाचवीला पूजला होता. कानन देवी यांचा जन्म २२ एप्रिल १९१६ रोजी पश्चिम बंगालमधील हावडा येथे झाला.

घरच्या गरीबीच्या बेताची असल्यामुळे त्यांच्या मूळ पालकांनी रतनचंद्र दास आणि राजोबाला या जोडप्याला कानन देवी यांना दत्तक दिलं. श्रीमंत असणाऱ्या रतनचंद्र यांनी काननदेवींवर खऱ्या मुलीपेक्षा जास्त प्रेम केलं. त्यांना अगदी लहान वयातच संगीताचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. मात्र,हे सुखाला कोणाची तरी नजर लागली. काननदेवी अवघ्या ६ वर्षाच्या असतांना त्यांना दत्तक घेणाऱ्या रतनचंद्र यांचं निधन झालं.

रतन यांच्यानंतर कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली.कुटुंब रस्त्यावर आले होते. घराचे भाडे भरण्यासाठी पैसे नसल्याने राजोबाला व कानन यांना भाड्याच्या घरातून बाहेर निघावे लागले.त्यांच्या परिस्थिती पाहून एका नातेवाईकाने त्यांना स्वतःच्या घरी राहण्यास बोलावलं. आतातरी दोन घास सुखाचे मिळतील म्हणून दोघी या नातेवाईकाकडे राहण्यास गेल्या पण इथेही दुर्दैवाने पाठ सोडली नाही.

या नातेवाईकाने परिवारातील सदस्य म्हणून नाही तर घरातील कामे करायलाच त्यांना बोलावले होते. तो त्यांना तासनतास त्यांना घरातील काम करायला लावायचा. सोबत दूषणंही द्यायचा. या नातेवाइकांचे अत्याचार वाढत होते पण दुसरीकडे आधार नाही म्हणून दोघी त्याच्याकडे राहत होत्या.

नातेवाइकांचे घर सोडल्यानंतर कानन आणि राजोबाला हावडा येथे आल्या. त्यांची हलाखीची परिस्थिती पाहून त्यांचे कौटुंबिक मित्र तुलसी बॅनर्जी म्हणजे काननदेवींचे काकाबाबू यांना एका थिएटरमध्ये त्यांच्या कामासाठी शिफारस केली.

बालपणापासूनच अतिशय सुंदर दिसणाऱ्या व तीक्ष्ण स्मरणशक्ती असणाऱ्या काननदेवींच्या हुशारी आणि सौंदर्याने प्रभावित होऊन मदन मूव्ही स्टुडिओने त्यांना चित्रपटातील भूमिकांसाठी दरमहा ५ रुपये पगार देण्याचं कबुल केलं. त्यांनंतर त्यांचा इंडस्ट्रीतील प्रवास सुरु झाला.

चित्रपटातील मूक युगा संपल्यानंतर चित्रपट बोलू लागला. या ध्वनीपटांमध्ये काननदेवींना यश गवसले. त्यांच्या अभिनय व गाण्याची चर्चा भारतातच नव्हे, तर हॉलिवूडच्या मासिकातदेखील झळकू लागल्या.काननदेवी यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत, एकूण ५७ चित्रपटांमध्ये काम केले, तर सुमारे ४० गाण्यांना आवाज दिला. चित्रपटसृष्टीतील त्या पहिल्या महिला अभिनेत्री होत्या, ज्यांना पुरुषप्रधान चित्रपटउद्योगात मॅडम संबोधले गेले.

त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांमध्ये त्यांचे नाव आघाडीवर होते. चित्रपटाचे बजेट १५-२० हजार रुपये आणि तिकीट सुमारे ३० पैसे असतांना होते, तेव्हा कानन एका गाण्यासाठी १ लाख रुपये आणि एका चित्रपटासाठी ५ लाख रुपये मानधन घेत असत.

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते के. एल. सेहगल, पंकज मलिक, प्रथमेश बरुआ, पहाडी संन्याल, छबी बिस्वास, अशोक कुमार यांच्यासोबतही काननदेवींनी काम केलं. काननदेवींना त्यांच्या कारकिर्दीत देविका राणी आणि रुबी मेयर्स यांच्यानंतर चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. १९६८ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. १७ जुलै १९९२ ला कोलकाताच्या बेलेव क्लिनीकमध्ये वयाच्या ७६ व्या वर्षी या अभिनेत्रीने या दुनियेला अलविदा म्हटलं.

















