संजू सॅमसनचं नाबाद शतक आणि गोलंदाजीत अकिल होसीनचा इम्पॅक्टफुल 'चौकारा'च्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने घरच्या मैदानात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला एकतर्फी पराभूत केले. पहिल्यांदा फलंदाजी करताना संजूनं 'वन मॅन आर्मी' शोचा नजराणा पेश करत ५४ चेंडूत केलेल्या नाबाद १०१ धावांच्या जोरावर चेन्नईच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात २०७ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा संघ १०४ धावांत आटोपला. CSK चा IPL मधील हा सर्वात मोठा विजय ठरला. दुसरीकडे MI वर लाजिरवाण्या पराभवाची नामुष्की ओढावली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संजू सॅमसन पूरन उरला अन् MI चा डाव फसला
मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात नाणेफेक जिंकून हार्दिक पांड्याने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या गोलंदाजांनी त्याचा निर्णय सार्थ ठरवताना एका बाजूनं ठराविक अंतराने विकेट काढल्या, पण संजू सॅमसन पुरून उरला. त्याने ५४ चेंडूत १० चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १०१ धावांची नाबाद खेळी केली. कर्णधार ऋतुराज गायकवाड १४ चेंडूत २२ धावांवर माघारी फिरल्यावर सरफराज खान ८ चेंडूत १४ धावांची भर घालून माघारी फिरला. डेवॉल्ड ब्रेविसची खेळीही २१ धावांवर थांबली. कार्तिक शर्मा १८ (१९) आणि जेमी ओवरटन १५ (७) यांनी केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोकावर चेन्नई सुपर किंग्सने निर्धारित २० षटकात ६ बाद २०७ धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून अश्वनी कुमार आणि अल्लाह गझनफर यांनी प्रत्येकी २-२ वकेट्स घेतल्या.
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्ड
फक्त ११ धावांत ३ विकेट्स
धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात फलंदाजीला आलेल्या दानिश मालेवार हा सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. अकिल होसीन याने त्याला खातेही न उघडता तंबूचा रस्ता दाखवला. मुकेश चौधरीनं क्विंटन डी कॉकला स्वस्तात माघारी धाडले. अकिल होसीन याने नमन धीरलाही खाते उघडू दिले नाही. मुंबई इंडियन्सच्या संघाने ११ धावांत ३ विकेट्स गमाल्या. इथंच सामना CSK च्या बाजूनं सेट झाला.
फक्त दोघांनीच गाठला दुहेरी आकडा
सूर्यकुमार यादवने ३० चेंडूत ५ चौकाराच्या मदतीने केलेल्या ३६ धावा आणि तिलक वर्मानं २९ चेंडूत केलेल्या ३७ धावांची खेळी वगळता अन्य एकाही बॅटरला दुहेरी आकडा गाठता आली नाही. परिणामी मुंबई इंडियन्सला IPL मध्ये सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की ओढावली.