होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 23:54 IST2026-04-23T23:48:32+5:302026-04-23T23:54:49+5:30
होर्मुजच्या सामुद्रधुनीत पसरवलेल्या सी-माइन्समुळे जागतिक तेलाचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती.

AI Generated Image
होर्मुजची सामुद्रधुनी हा केवळ एक सागरी मार्ग नसून जागतिक अर्थव्यवस्थेची मुख्य धमनी आहे. मात्र, याच मार्गावर आता मृत्यूचे सावट अर्थात माइन्स पसरले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये मोठ्या प्रमाणावर सी-माइन्स (सागरी सुरुंग) पेरण्यात आल्या असून, या धोकादायक सुरुंगाच्या जाळ्यातून हा मार्ग मोकळा करण्यासाठी युद्ध थांबल्यानंतरही तब्बल ६ महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असा धक्कादायक दावा एका अमेरिकन रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण जगाच्या चिंतेत भर पडली आहे.
अर्थव्यवस्थेची धडधड थांबणार?
जगभरातून प्रवास करणाऱ्या दर पाचपैकी एक जहाज याच मार्गावरून हजारो टन कच्च्या तेलाची वाहतूक करते. पेंटागॉनने अमेरिकन खासदारांना दिलेल्या गोपनीय ब्रीफिंगमध्ये या धोक्याची कल्पना दिली आहे. या अहवालानुसार, होर्मुजमध्ये २० पेक्षा जास्त सी-माइन्स पसरवण्यात आल्या आहेत. काही माइन्स तर जीपीएस तंत्रज्ञानाने सज्ज असून त्या पाण्यावर तरंगत आहेत, ज्यामुळे त्यांचा शोध घेणे अत्यंत कठीण झाले आहे. येत्या २०२७ पर्यंत इंधन आणि गॅसचे दर आकाशाला भिडण्याची दाट शक्यता या अहवालामुळे निर्माण झाली आहे.
काय आहे 'सी-माइन्स'चे हे भयाण संकट?
सी-माइन्स म्हणजे समुद्राच्या पोटात दडलेले जिवंत बॉम्ब. इराणसारखे देश या कामात निष्णात मानले जातात. विशेष म्हणजे, अतिवेगवान छोट्या नौका, पाणबुड्या आणि अगदी मासेमारी करणाऱ्या बोटींचा वापर करून या माइन्स समुद्रात पेरल्या जातात. समुद्राच्या तळाशी बसवलेल्या किंवा साखळीने बांधलेल्या या माइन्स जहाज जवळ येताच सक्रिय होतात आणि प्रचंड स्फोट घडवून आणतात.
स्वस्त पण विध्वंसक शस्त्र
विशेष म्हणजे, एक आधुनिक सी-माइन तयार करण्यासाठी साधारण १० हजार डॉलरचा खर्च येतो, परंतु ती एका मोठ्या जहाजाचे नुकसान करून अब्जावधी डॉलर्सचे आर्थिक नुकसान करू शकते. सी-बेड माइन्स, मूर्ड माइन आणि ड्रिफ्टिंग माइन अशा विविध प्रकारच्या सुरुंगांनी हा मार्ग आता अत्यंत धोकादायक बनला आहे.
तज्ज्ञांच्या मते, इराणकडे २ हजार ते ६ हजार सी-माइन्सचा साठा असून, त्यातील एक मोठा भाग त्यांनी स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केला आहे. जर होर्मुज मार्ग ६ महिन्यांसाठी बंद झाला, तर जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होईल आणि त्याचे परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर महागाईच्या स्वरूपात नक्कीच दिसून येतील. या घटनेमुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष होर्मुजच्या हालचालींकडे लागले आहे.