लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 23:09 IST2026-04-23T23:06:53+5:302026-04-23T23:09:06+5:30
कार्यालयातील सिनियर्सनी केलेल्या लैंगिक छळामुळे एक विवाहिता मनोरुग्ण बनली.

AI Generated Image
नरेश डोंगरे
नागपूर : कार्यालयातील सिनियर्सनी केलेल्या लैंगिक छळामुळे एक विवाहिता मनोरुग्ण बनली. त्यामुळे संबंधित आरोपींवर कारवाई व्हावी आणि आपल्या उध्वस्त कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून तरुणीचा पती कायदेशिर लढा देत आहे. तर, त्याला दिलासा मिळण्याऐवजी संबंधित यंत्रणांकडून प्रचंड मानसिक त्रास मिळत असल्याने आता या तरुणावरही वेडा होण्याची वेळ आली आहे.
‘लोकमत’जवळ आज या पीडित तरुणाने कागदोपत्री कैफियत मांडली, ती संतापजनक आहे. पीडित पती-पत्नी बेसा येथील रहिवासी आहे. १४ वर्षांपुर्वी त्यांचा विवाह झाला. त्यांना ११ वर्षांची मुलगी आहे. तरुणी २०२१ मध्ये खासगी नोकरी करू लागली. तेथील दोन सहकारी तिला अश्लिल मेसेज पाठवून, संधी मिळताच नको तसे वर्तन करून तिचा छळ करू लागले. छळ असह्य झाल्याने तरुणीने पतीसह वरिष्ठांकडे आपबिती सांगितली. त्यानंतर तिला नोकरीला मुकावे लागले. या घटनेचा तिच्या मनावर मोठा आघात झाला ती मनोरुग्ण बनली. या प्रकारानंतर घरच्या स्वयंपाकासोबतच सर्व कामे आणि नोकरी सांभाळून पतीने पत्नीवर उपचार करून न्याय मिळावा म्हणून पोलिसांसह संबंधित यंत्रणांचे उंबरठे झिजवू लागला.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात रात्री तिच्याकडे दोन तरुण आले आणि तिचे केस कापून तिला आणखी विद्रूप करून गेले. तरुणाने त्यावेळी बेलतरोडी पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, बरेच हेलपाटे घेतल्यानंतर त्याला प्रकरण अदखलपात्र असल्याचे सांगण्यात आले. परिणामी पीडित पतीने न्यायासाठी अनुसुचित जाती-जमाती आयोग तसेच राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. दोन्हीकडून त्याला पोच मिळाली. दरम्यान, १० मार्च २०२६ ला राज्य महिला आयोगाकडून नागपूरच्या पोलीस आयुक्त कार्यालयाला पत्र पाठवून तक्रारीच्या आधारावर तातडीने कारवाई करून अहवाल आयोगाच्या कार्यालयास कळवण्ण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार, सहायक पोलिस आयुक्तांनी पीडित पतीचे बयाण नोंदविले. आज परत त्याला सीताबर्डी ठाण्यात बोलवून पत्नीला (जी मनोरुग्ण आहे) बयाणासाठी आणण्याचे निर्देश दिले. ती मनोरुग्ण आहे, कसे बयाण देईल, असा प्रश्न केला असता पोलिसांनी पीडितेच्या नावे एक सूचनापत्र दिले. त्यात पाच दिवसांच्या आत पोलीस ठाण्यात बयाण देण्यासाठी हजर राहण्याची सूचना केली आहे.
डोके फोडून घेऊ का ?
न्याय मिळण्याऐवजी सारखा सारखा मनस्ताप मिळत असल्याने मलाच आता वेडा झाल्यासारखे वाटते. आपणच डोके फोडून घ्यावे, असे वाटत असल्याचे पीडित तरुणाने उद्विग्नता व्यक्त करताना म्हटले.
निष्पक्ष आणि गंभीर चाैकशी
या संबंधाने सीताबर्डीचे ठाणेदार विठ्ठलसिंग राजपूत यांच्याकडे संपर्क केला असता ते म्हणाले, तीन वर्षांपूर्वी पीडितेकडून तत्कालिन अधिकाऱ्यांकडे तक्रार आली होती. आता परत पतीने तक्रार केल्याने सर्वकष चाैकशी केली जात आहे.सूचनापत्र हा त्याचाच भाग आहे. न्याय मिळवून देण्यासाठी निष्पक्ष आणि गंभीर चाैकशी केली जात असल्याचे राजपूत यांनी सांगितले.