ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 10:47 IST2025-04-25T10:31:08+5:302025-04-25T10:47:13+5:30

SBI FD: साधारणपणे जेव्हा तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करता तेव्हा मॅच्युरिटी संपेपर्यंत तुम्हाला तुमचे पैसे डिपॉझिटमध्ये ठेवावे लागतात. जर तुम्ही एफडी मध्येच मोडली तर दंड भरावा लागतो. यात एफडीचे बेनिफिट्सही मिळतात, पण ही एफडी यापेक्षा वेगळी आहे.

SBI FD: साधारणपणे जेव्हा तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करता तेव्हा मॅच्युरिटी संपेपर्यंत तुम्हाला तुमचे पैसे डिपॉझिटमध्ये ठेवावे लागतात. जर तुम्ही एफडी मध्येच मोडली तर दंड भरावा लागतो. पण एसबीआय आपल्या गुंतवणूकदारांसाठी एफडी स्कीम चालवते, ज्यामध्ये लॉक-इन पीरियडचा त्रास नाही. त्यात हवा तेवढा वेळ तुम्ही पैसे ठेवू शकता आणि एफडीचे व्याज घेत राहू शकता. इतकंच काय तर गरज पडल्यास एटीएममधून पटकन पैसे काढू शकता. एसबीआयच्या या एफडीशी संबंधित खास गोष्टी जाणून घेऊ.

आम्ही तुम्हाला एसबीआयच्या स्कीमविषयी सांगत आहोत. या स्कीमचं नाव एसबीआय मल्टी ऑप्शन डिपॉझिट स्कीम (SBI Multi Option Deposit Scheme) आहे. या योजनेत ठेवीदाराला इतर एफडीइतकंच व्याज मिळतं. या योजनेचा फायदा म्हणजे तुमचे पैसे नेहमीच लिक्विड असतात, म्हणजेच तुम्ही दंड न भरता एफडीच्या मॅच्युरिटीपूर्वी केव्हाही पैसे काढू शकता.

बचत खात्यातून ज्याप्रमाणे तुम्ही पैसे काढता त्याप्रमाणे तुम्ही एटीएम किंवा चेकद्वारे हे पैसे काढू शकता. वास्तविक, ही एफडी योजना ठेवीदारांच्या बचत किंवा चालू खात्याशी जोडलेली असते. अशा परिस्थितीत ठेवीदारांना एटीएमच्या माध्यमातून एफडीमधून आवश्यक रक्कम केव्हाही काढण्याची सुविधा मिळते.

साधारणपणे जेव्हा तुम्ही एफडी तोडता तेव्हा तुम्ही त्यातून संपूर्ण रक्कम काढता, पण एसबीआयमध्ये (MODS) याची गरज नसते. तुम्ही तुमच्या गरजेनुसार १००० रुपयांच्या पटीत म्हणजे १,०००, २,०००, ५,०००, १०,००० रुपये काढू शकता. काढलेल्या रकमेनंतर शिल्लक राहिलेल्या रकमेवर तुम्हाला एफडीचे व्याज मिळत राहील. पैसे काढण्याची सुविधा एकरकमी आहे असं नाही, तुम्ही १००० रुपयांच्या पटीत अनेक वेळा पैसे काढू शकता.

एसबीआय (MODS) मध्ये तुम्ही एक वर्षापासून ते पाच वर्षांपर्यंत पैसे जमा करू शकता. व्याजदर वर्षागणिक बदलत असतात. सामान्य एफडीप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांनाही ०.५० टक्के अतिरिक्त व्याज मिळतं. या योजनेत नॉमिनेशनची सुविधाही उपलब्ध आहे. मात्र, ही योजना घेतल्यानंतरही बचत खात्यात सरासरी मासिक शिल्लक (AMB) ठेवणं आवश्यक आहे.

हे खाते तुम्ही दुसऱ्या शाखेतही ट्रान्सफर करू शकता. एमओडी अकाऊंटमध्ये ऑटो-स्वीप फीचर देखील आहे. त्यासाठी एक मर्यादा ठरवावी लागते. तुमचं डिपॉझिट त्या मर्यादेपेक्षा जास्त होताच बँक ऑटो स्वीपच्या माध्यमातून तो अतिरिक्त निधी एफडीमध्ये जमा करते.

ऑटो स्वीपसाठी किमान थ्रेशोल्ड बॅलन्स ३५,००० रुपये आणि मिनिमम रिझल्ट बॅलन्स २५,००० रुपये असावा लागतो. जर तुम्हालाही एसबीआयच्या या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाईनही खातं उघडू शकता किंवा जवळच्या कोणत्याही शाखेत जाऊन उघडू शकता. त्यात मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागतो.