Easy Trip Planners IPO: ८ मार्चला उघडणार ५१० कोटींचा आयपीओ, पाहा किती आहे प्राईज बँड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 04:16 PM2021-03-04T16:16:36+5:302021-03-04T16:28:09+5:30

Easy Trip Planners IPO: ग्रे मार्केटमध्ये ९० टक्के प्रिमिअमवर शेअर ट्रेड

IPO मार्केटमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली नसेल तर आता पुन्हा एकदा तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. आयपीओमध्ये आता एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.

ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सी Easy Trip Planners ८ मार्च रोजी आपला आयपीओ लाँच करणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी ५१० कोटी रूपये जमवणार आहे.

यासाठी Easy Trip Planners नं प्राईज बँड १८६-१८७ रूपये इतका निश्चित केला आहे. हा आयपीओ ८ ते १० मार्चदरम्यान खुला राहिल. तसंच १९ मार्च रोजी या शेअर ची शेअर बाजारात लिस्टींग होण्याची शक्यता आहे.

Easy Trip Planners चा हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल असेल. या आयपीओमध्ये प्रमोटर निशांत पिट्टी आणि रिकांत पिट्टी ऑफर फॉर सेलद्वारे २५५ कोटी रूपयांचे शेअर्स विकणार आहेत.

Easy Trip Planners ट्रॅव्हल, प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसचं एंड टू एंड ट्रॅव्हल सोल्युशन देते.

यामध्ये विमानाचं तिकिट, रेल्वेचं तिकिट, बस आणि टॅक्सी सेवा, इन्शुरन्स, व्हिसा प्रोसेसिंग आणि अन्य प्रवासासाठी तिकिटं अशा सुविधा उपलब्ध करून देते.

Easy Trip Planners च्या आयपीओअंतर्गत शेअर्सची लॉट साईज ८० इतकी ठेवण्यात आली आहे. म्हणजेच ग्राहकांना कमीतकमी ८० शेअर्सची बोली लावणं आवश्यक आहे.

यासाठी तुम्हाला किमान १४,९६० रूपयांची गुंतवणूक करावी लागेल.

अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि जेएम फायनॅन्शिअल कन्सल्टन्ट्स प्रायव्हेट लिमिटेड हे या आयपीओचे लीड मॅनेजर्स आहेत.

या आयपीओचा ७५ टक्के हिस्सा हा क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी आहे.

तर १५ टक्के हिस्सा हा नॉन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्ससाठी आहे. १० टक्के हिस्सा हा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवण्यात आला आहे.

मार्च २०२० पर्यंत या कंपनीसह देशभरातील जवळपास मोठ्या शहरांमधील ५५,९८१ ट्रॅव्हल एजन्ट्स रजिस्टर्ड होते.

CRISIL च्या एका रिपोर्टनुसार Easy Trip Planners कडे देशातील ट्रॅव्हल एजन्सींचं मोठं नेटवर्क आहे.

डिसेंबर महिन्यात कंपनीकडे रजिस्टर्ड एजन्ट्सची संख्या ५९,२७४ इतकी होती. सध्या कंपनीची आर्थिक स्थितीही चांगली आहे.

परंतु लॉकडाऊनचा कंपनीच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. परंतु ग्रे मार्केटमध्ये मात्र हा शेअर ९० टक्के प्रिमिअमवर १६६-१७० च्या प्राईज बँडवर ट्रेड करत आहे.