२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 16:03 IST2026-05-09T15:33:54+5:302026-05-09T16:03:56+5:30
मिथुन राशीत दोन शत्रू ग्रहांची युती होणार असून, याचा अनेक राशींना विविध प्रकारचे लाभ होणार असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

मे महिन्याच्या मध्यात नवग्रहातील शुक्र ग्रह स्वराशीतून मिथुन राशीत प्रवेश करत आहे. मिथुन राशीत गुरू ग्रह विराजमान आहे. त्यामुळे शुक्र आणि गुरू यांचा युती योग जुळून आला आहे. वास्तविक पाहता गुरू आणि शुक्र शत्रू ग्रह मानले जातात. परंतु, या दोन ग्रहांच्या योगामुळे गजलक्ष्मी नावाचा राजयोग निर्माण होतो.

१४ मे २०२६ रोजी शुक्र मिथुन राशीत प्रवेश करणार असून, ०८ जून २०२६ पर्यंत याच राशीत असणार आहे. सुमारे २५ दिवस शुक्र मिथुन राशीत असणार आहे. या गोचरामुळे अनेक राशींच्या बाबतीत प्रेम, पैसा, करिअर, नातेसंबंध आणि सुखसोयींमध्ये बदल घडवून आणेल.

शुक्र हा ऐश्वर्य, विवाह, संपत्ती, आदर, प्रेम आणि आकर्षण यांचा कारक मानला जातो. गुरू आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचा पुढील २५ दिवसांपर्यंत कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? जाणून घेऊया...

मेष: सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते. कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि पगारवाढीची शक्यता आहे. आर्थिक लाभाच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. नोकरदार व्यक्तींना करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील, तर व्यावसायिकांना नवीन भागीदारी आणि सौद्यांमधून फायदा होऊ शकतो.

वृषभ: उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होऊ शकतात. कुटुंबात शांतता आणि आनंद नांदेल. एखाद्या शुभ कार्यक्रमात किंवा विवाह सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि समृद्धी वाढेल.

मिथुन: बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि मानसिक ताण कमी होईल. वाहन, घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ प्रगती आणि नवीन संधी घेऊन येईल.

कर्क: आध्यात्मिक आवड वाढू शकते आणि दीर्घकाळापासूनच्या इच्छांची पूर्तता होण्याचे संकेत मिळतात. तथापि, या काळात अनावश्यक खर्च वाढू शकतो, त्यामुळे आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे.

सिंह: विविध क्षेत्रांमध्ये लाभ मिळू शकतो. दीर्घकाळापासूनची इच्छा तसेच ध्येय पूर्ण होऊ शकते. उत्पन्नात वाढ होण्याचे प्रबळ संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात चांगले परिणाम दिसू शकतात. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते.

कन्या: करिअर आणि व्यवसायात प्रगतीसाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील. पदोन्नती, पगारवाढ किंवा चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. नशीब तुमच्या बाजूने असेल आणि थांबलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात.

तूळ: अचानक आर्थिक लाभ किंवा वडिलोपार्जित मालमत्तेचा वारसा मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षण आणि परदेश प्रवासाच्या संधी निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, परंतु कालांतराने त्यावर उपाय सापडतील.

वृश्चिक: वैयक्तिक संबंधांमध्ये भावनिकता वाढू शकेल. तसेच संवेदनशीलताही टिकून राहील. प्रेमसंबंधांमध्ये गुप्तता वाढू शकते. आर्थिक बाबींमध्ये संमिश्र परिणाम मिळतील, त्यामुळे विचारपूर्वक गुंतवणूक करा.

धनु: वैवाहिक जीवनात प्रेम आणि सुसंवाद वाढेल. व्यवसायातील भागीदारी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे आणि नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

मकर: आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. खर्च वाढू शकतो, त्यामुळे बजेट संतुलित ठेवा. नोकरी करणाऱ्यांसाठी हा चांगला काळ असेल आणि स्पर्धात्मक कामांमध्ये यश मिळेल. प्रतिस्पर्धकांवर मात करण्यातही यशस्वी होऊ शकता.

कुंभ: प्रेमसंबंध अधिक गोड आणि उत्साही होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळण्याची चांगली संधी आहे. सर्जनशील कामात प्रगती होईल. नवीन योजना यशस्वी होऊ शकतात. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील.

मीन: कौटुंबिक जीवनात अधूनमधून मतभेद किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे स्पष्ट संवाद ठेवा. घरात नवीन वाहन किंवा मौल्यवान वस्तू येण्याची शक्यता आहे. आईकडून पाठिंबा मिळेल. भावंडांसोबतचे संबंध सुधारतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
















