PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 14:29 IST2026-05-09T14:28:37+5:302026-05-09T14:29:30+5:30
PM Modi Makhanlal Sarkar West Bengal Politics: ९८व्या वर्षीय माखनलाल सरकार यांच्या सन्मानानंतर पत्नी पुतूल सरकार भावनिक झाल्या

PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
PM Modi Makhanlal Sarkar West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये आज भाजपचा मुख्यमंत्री विराजमान झाला. सुवेंदु अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यादरम्यान एक रंजक घटना घडली. पंतप्रधान मोदी मंचावर येताच ते इतरांना भेटले, पण एका ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या मात्र ते आवर्जून पाया पडले. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी सर्वात वयस्कर कार्यकर्त्याला आदराने वंदन केले. ते भाजपच्या स्थापनेपूर्वीपासूनच या संघटनेशी एकनिष्ठ व संबंधित आहेत. त्यांचे नाव माखनलाल सरकार. मोदी त्यांच्या पाया पडल्यानंतर, माखनलाल यांच्या पत्नीची प्रतिक्रिया समोर आली आहे.
माखनलाल सरकार यांची पत्नी काय म्हणाली?
शपथविधी सोहळ्याच्या मंचावर सन्मान मिळाल्यानंतर चर्चेत आलेल्या माखनलाल सरकार यांच्या कुटुंबीयांशी आज तकने संवाद साधला. माखनलाल सरकार यांच्या ७७ वर्षीय पत्नी पुतुल सरकार यांनी गदगदलेल्या आवाजात सांगितले, "मी खूप आनंदी आणि भावुक झाले आहे. माझ्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत असेलच. माझ्या पतीला इतका मोठा सन्मान मिळालेला पाहून खूप छान वाटले. ते अगदी सुरुवातीपासूनच पक्षाशी एकनिष्ठ होते. त्यांनी खूप मेहनत केली. लग्नानंतर जेव्हा मी त्यांच्यासोबत राहायला आले, तेव्हा मी त्यांना संघटनेसाठी तासन्तास काम करताना पाहिले आहे. ते अनेकदा कामासाठी पहाटेच घराबाहेर पडायचे. वयाच्या १६ व्या वर्षापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) निष्ठेने जोडलेले होते. ते सकाळी लवकर शाखेत जायचे. मग, मध्ये वेळ मिळाल्यास, ते नाश्ता आणि दुपारच्या जेवणासाठी यायचे आणि मग पुन्हा कामासाठी निघून जायचे. आज जेव्हा मंचावर त्यांच्या अनेक वर्षांच्या संघर्षाचा सन्मान करण्यात आला, तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला."
#WATCH | Kolkata | PM Modi felicitates and takes blessings of Makhanlal Sarkar, one of the most senior workers of the BJP in West Bengal.
— ANI (@ANI) May 9, 2026
In 1952, Makhanlal Sarkar was arrested in Kashmir while accompanying Syama Prasad Mukherjee during the movement to hoist the Indian… pic.twitter.com/gpmLISKYZ5
कोण आहेत माखनलाल सरकार?
९८ वर्षीय माखनलाल सरकार हे स्वातंत्र्योत्तर भारतातील राष्ट्रवादी चळवळीत सहभागी झालेल्या सुरुवातीच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपैकी एक मानले जातात. १९५२ मध्ये, काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनात ते श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासोबत सामील झाले होते. या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला. १९८० मध्ये भाजपच्या स्थापनेनंतर, त्यांची पश्चिम दिनाजपूर, जलपाईगुडी आणि दार्जिलिंग जिल्ह्यांसाठी संघटन समन्वयक म्हणून नियुक्ती झाली. केवळ एका वर्षाच्या आत, त्यांनी पक्षात जवळपास १०,००० नवीन सदस्यांची नोंदणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.