होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 18:48 IST2026-05-09T18:44:42+5:302026-05-09T18:48:16+5:30
यासंदर्भात अमेरिकन लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या या टँकर्सने अमेरिकेची नाकेबंदी (Blockade) तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अमेरिकन सैनिकांनी यशस्वीपणे रोखला.

होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये अमेरिका-इराण यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता अमेरिकन सैनिकांनी इराणच्या दोन तेलवाहू टँकर्सवर हल्ला करून ती निकामी केली. यासंदर्भात 'एपी' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या भागात रात्रभर दोन्ही बाजूंनी भीषण गोळीबार झाला. यातच, संयुक्त अरब अमिरातीनेही (UAE) आपल्यावर इराणने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केल्याचा दावा केला आहे. या ताज्या घडामोडीने मध्यपूर्व आशियात पुन्हा युद्ध पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिकेची नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न -
यासंदर्भात अमेरिकन लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या या टँकर्सने अमेरिकेची नाकेबंदी (Blockade) तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अमेरिकन सैनिकांनी यशस्वीपणे रोखला. यापूर्वी नौदलाच्या तीन जहाजांवरील हल्ले परतवून लावत अमेरिकेने होर्मुझमधील इराणी लष्करी तळांनाही प्रत्युत्तर दिले होते.
अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर संयुक्त हल्ला चढवला होता. तेव्हापासूनच इराणने जगाची ऊर्जा पुरवठ्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला हा जलमार्ग (होर्मुझ समुद्रधुनी) बंद केली आहे. यामुळे जागतिक पातळीवर इंधनाचे दर अक्षरशः गगनाला भिडले आहेत. दरम्यान, एप्रिल महिन्यातील अमेरिका-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरल्यानंतर, अमेरिकेने इराणी बंदरांना वेढा घातल नाकेबंदी केली आहे.
या संघर्षावर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी स्पष्ट केले की, इराणने अमेरिकन हितांना आव्हान दिल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल. तर दुसरीकडे, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेची ही कृती चिथावणीखोर आणि युद्धविरामाचे उल्लंघन करणारी असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांच्या संपर्कात असल्याचे सांगितले असले, तरी अणुकार्यक्रम आणि होर्मुझमधील वाहतुकीवरून निर्माण झालेला हा गतिरोध सध्या जगाची चिंता वाढवणारा ठरत आहे.