शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 15:19 IST2026-05-09T15:18:46+5:302026-05-09T15:19:27+5:30
Suvendu Adhikari Oath Ceremony: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी पंतप्रधान मोदींसह सर्व उपस्थितांना अभिवादन केले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुवेंदू अधिकारी यांनी दिलेल्या खास भेटीची शपथविधीनंतर एकच चर्चा सुरू आहे.

शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पहिल्यांदाच भाजपाचं सरकार स्थापन झाले आहे. बंगालची राजधानी कोलकाता येथे मोठ्या थाटामाटात झालेल्या या शपथविधीच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी पंतप्रधान मोदींसह सर्व उपस्थितांना अभिवादन केले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुवेंदू अधिकारी यांनी दिलेल्या खास भेटीची शपथविधीनंतर एकच चर्चा सुरू आहे.
शपथविधीनंतर उपस्थितांना अभिवादन करत सुवेंदू अधिकारी हे योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत पोहोचले तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्याकडची भगवी शाल काढून सुवेंदू अधिकारी यांच्या गळ्यात घातली. प्रखर हिंदुत्ववादी नेते योगी आदित्यनाथ यांनी सुवेंदू अधिकारी यांना दिलेली भगवी शाल ही खास भेट मानली जात आहे.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाकून नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. तर मोदींनीही सुवेंदू अधिकारी यांची गळाभेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं.
दरम्यान, आजच्या शपथविधीसाठी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत भगवा कुर्ता आणि भगवा टिळा लावून करून आलेल्या सुवेंदू अधिकारी यांची वेशभूषा हा चर्चेचा विषय ठरली होती. तसेच राज्यपालांकडून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंचावर उपस्थित असलेल्या वरिष्ठ नेत्यांचे आशीर्वाद घेतले आणि शुभेंच्छांचा स्वीकार केला.