नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 16:11 IST2026-05-09T16:11:13+5:302026-05-09T16:11:45+5:30
Harshwardhan Sapkal Criticize BJP: निदा खानला झालेली अटक आणि नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप
मुंबई - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि बेकायदा धर्मांतर प्रकरणातील अनेक दिवस फरार असलेली मुख्य संशयित निदा खान हिला ७ मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली होती. ती नारेगाव कैसर कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये कुटुंबीयांसह लपून राहत होती. दरम्यान, निदा खान हिला लपण्यामध्ये एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याचा हात असल्याचे समोर आल्यानंतर भाजप तसेच शिंदेसेनेकडून त्याच्याविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. तर निदा खानला झालेली अटक आणि नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
नाशिकच्या TCS प्रकरणी निदा खानला अटक केल्याच्या प्रश्नावर बोलताना काँग्रेस प्रदेशध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, या प्रकरणातील एफआयआर अद्याप सार्वजनिक केलेला नाही तो सार्वजनिक करावा. कायद्याने त्यांचे काम करावे पण या प्रकरणाच्या माध्यमातून धार्मिक धृवीकरण करण्याचा खेळ भारतीय जनता पक्ष करत आहे. एवढे दिवस पोलीस झोपा काढत होते का, याचे उत्तर द्यावे. या प्रकरणाला हवा देण्यात सरकारचा काही हात आहे का, हे उघड झाले पाहिजे. मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे करतो, हा तमाशा बंद करा, असे सपकाळ म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवंडे यांच्यावरील शाईहल्ला, धक्काबुक्की व शिवीगाळ हा भ्याड हल्ला असून, हल्लेखोर वारकरी संप्रदायाच्या विचाराला माननारे नाहीत. या प्रकरणाला भाजपाची चिथावणी असून अशा हल्लेखोरांना भाजपा सरकार संरक्षण देत आले आहे. विकास लवंडे यांच्यावरील हल्ला हा वारकरी संप्रदायाचा अपमान आहे, या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा, अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना ते पुढे म्हणाले की, विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्याचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करत आहे. विकास लवांडे हे वारकरी संप्रदायाचा समता, बुंधता व सामाजिक न्यायाचा विचार पुढे घेऊन जाणारे आहेत. वारकरी संप्रदायात मनुवादी विचार वाढत आहे, ही चिंता त्यांनी व्यक्त केली होती, ती या हल्ल्याने खरी करून दाखवली आहे. मूठभर लोकांच्या हाती धर्मसत्ता व राजसत्ता असावी या विचाराचा मोठा फटका छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनेक साधू संतांनाही बसला आहे. संत तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवणारे, संत ज्ञानेश्वर यांना छळणारे, सावित्रिबाई फुले यांना छळणारा विचार हाच आहे. या मनुवादी विचाराला कंटाळून गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली, महाविरांनी जैन धर्माची स्थापना केली,हीच परंपरा महात्मा बसवेश्वर पुढे घेऊन गेले. हा मनुवादी विचार भाजपा व रा. स्व. संघाचा आहे, याच विचाराने दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांनाही छळले आहे.