सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 17:17 IST2026-05-09T17:16:04+5:302026-05-09T17:17:58+5:30

West Bengal TMC Abhishek Banerjee Post: लोकशाही, संविधानिक मूल्ये, जनतेचे हक्क आणि सन्मान यासाठीचा आमचा लढा निर्भयपणे सुरू राहील, असे अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

tmc abhishek banerjee long post after suvendu adhikari took oath as chief minister of west bengal | सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला

सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला

West Bengal TMC Abhishek Banerjee Post: लोकशाही केवळ तेव्हाच टिकू शकते, जेव्हा निवडणूक संस्था नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करतात. दुर्दैवाने, जे काही अनुभवले आहे, त्यामुळे त्या विश्वासाला तडा गेलेला आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षता, विश्वासार्हता आणि पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे, अशी टीका तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी केली. पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांचा शपथपविधी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभली होती. हा शपथविधी पार पडल्यावर अभिषेक बॅनर्जी यांनी एक्सवर प्रदीर्घ पोस्ट लिहिली. 

या पोस्टमध्ये अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपा, केंद्रीय निवडणूक आयोग, निवडणूक प्रक्रिया यांवरून हल्लाबोल केला.  ज्या लोकशाही संस्थांनी निष्पक्षपातीपणे कार्य करणे अपेक्षित आहे, त्यांनी अनेक तडजोडी केल्या. आमच्यासाठी ही निवडणूक अत्यंत कठीण होती. कारण सुमारे ३० लाख खऱ्या मतदारांना कथितरित्या मतदार यादीतून वगळले. मतदानाच्या अधिकारापासून त्यांना वंचित ठेवण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अनेक सरकारी संस्था तसेच भारताच्या निवडणूक आयोगाकडून झालेली अत्यंत पक्षपाती वर्तणूक आम्ही अनुभवली, असा दावा अभिषेक बॅनर्जी यांनी केला. 

जनतेचा खरा कौल खरोखरच मानला गेला आहे की नाही

मतमोजणी प्रक्रियेपासून ते EVMs च्या हाताळणी व हालचालींबाबतचे आरोप, तसेच 'कंट्रोल युनिट्स'मधील तफावत, अशा अनेक चिंताजनक घटनांमुळे लक्षावधी लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे की, जनतेचा खरा कौल खरोखरच मानला गेला आहे की नाही. मी यापूर्वीच मतमोजणी केंद्रांमधील CCTV फुटेज सार्वजनिक करण्याची, तसेच VVPAT चिठ्ठ्यांची पारदर्शकपणे मोजणी करण्याची मागणी केली आहे; जेणेकरून सत्य जनतेसमोर येऊ शकेल आणि प्रत्येक शंकेचे निरसन खुलेपणाने व प्रामाणिकपणे करता येईल. दिल्ली आणि पश्चिम बंगाल या दोन्ही ठिकाणी आम्ही एक खंबीर, ठाम आणि तडजोड न करणारा विरोधी पक्ष म्हणून कायम राहू, असे आश्वासन अभिषेक बॅनर्जी यांनी यावेळी दिले. 

निवडणुकीनंतरचा हिंसाचार लोकशाहीत अत्यंत चिंताजनक

निवडणुकीनंतरचा हिंसाचार, पक्षाच्या कार्यालयांवरील हल्ले, आमच्या पक्ष कार्यकर्त्यांना घातली जाणारी भीती आणि समर्थकांना दिल्या जाणाऱ्या धमक्या याबाबतचे अहवाल एका लोकशाही समाजात अत्यंत चिंताजनक आणि पूर्णपणे अस्वीकार्य आहेत. ज्या अनेक समर्पित तृणमूल कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणावर अथक परिश्रम घेतले, त्यांना कथितरित्या लक्ष्य करून हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे; तसेच भीती आणि असुरक्षिततेमुळे त्यांना आपली घरे सोडून पलायन करण्यास भाग पडले आहे. लोकशाहीमध्ये कोणत्याही राजकीय कार्यकर्त्यावर स्वतःची सुरक्षा आणि आपली राजकीय विचारसरणी यांपैकी एकाची निवड करण्याची वेळ कधीही येता कामा नये, असे अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

आमचा लढा निर्भयपणे आणि कोणत्याही तडजोडीविना सुरू राहील

या महान राष्ट्राच्या लोकशाही परंपरांना सर्वोपरि मानून, मी आणि तृणमूल काँग्रेसमधील माझे सहकारी पश्चिम बंगालच्या जनतेच्या पाठीशी, आम्हाला 'तडजोडग्रस्त निवडणूक यंत्रणा' असे वाटते, त्याविरुद्ध निकराने लढा देणाऱ्या तृणमूलच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे कायम उभे असू.  ममता बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली लोकशाही, संविधानिक मूल्ये, जनतेचे हक्क आणि सन्मान यासाठीचा आमचा लढा निर्भयपणे आणि कोणत्याही तडजोडीविना सुरू राहील, असा निर्धार अभिषेक बॅनर्जी यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, या कठीण काळात प्रत्येक तृणमूल समर्थक आणि कार्यकर्त्यांनी खंबीर आणि एकजूट राहावे, असे मी आवाहन करतो. कोणालाही निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराला, दडपशाहीला किंवा धमक्यांना सामोरे जावे लागले असेल, तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. मला माहिती द्यावी. मला थेट संदेश पाठवावा, अशी मी विनंती करतो. त्यांची सुरक्षा आणि संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी, उपलब्ध असलेल्या प्रत्येक कायदेशीर, लोकशाही मार्गाचा अवलंब करण्यासाठी, माझ्या क्षमतेनुसार शक्य ते सर्व काही मी करेन. सत्याचाच विजय व्हावा आणि आता दोन्ही सरकारे पश्चिम बंगालच्या जनतेच्या हितासाठी खरोखरच काम करतील याची खात्री करण्यासाठी चाललेल्या या लढ्यात मी प्रत्येक तृणमूल कार्यकर्ता आणि समर्थकाच्या खांद्याला खांदा लावून उभा राहीन, असा शब्द अभिषेक बॅनर्जी यांनी दिला.

 

Web Title : सुवेंदु अधिकारी के शपथ के बाद अभिषेक बनर्जी ने बीजेपी पर हमला बोला।

Web Summary : अभिषेक बनर्जी ने चुनाव प्रक्रिया की आलोचना करते हुए मतदाता दमन और सरकारी एजेंसियों द्वारा पक्षपातपूर्ण आचरण का आरोप लगाया। उन्होंने ईवीएम हैंडलिंग पर सवाल उठाया और सीसीटीवी फुटेज जारी करने की मांग की। उन्होंने अटूट विरोध और चुनाव के बाद हिंसा का सामना कर रहे पार्टी कार्यकर्ताओं के लिए समर्थन का आश्वासन दिया। उन्होंने लोकतंत्र और संवैधानिक मूल्यों के लिए लड़ने का संकल्प लिया।

Web Title : Abhishek Banerjee slams BJP after Suvendu Adhikari's oath ceremony.

Web Summary : Abhishek Banerjee criticized the election process, alleging voter suppression and biased conduct by government agencies. He questioned EVM handling and demanded CCTV footage release. He assured unwavering opposition and support for party workers facing post-election violence. He pledged to fight for democracy and constitutional values.