लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 20:26 IST2026-05-03T20:14:10+5:302026-05-03T20:26:13+5:30
अनेकदा आपण आरामाच्या नादात लॅपटॉप बेडवर, उशीवर किंवा अगदी अंगावर ब्लँकेट घेऊन वापरतो. जर तुम्हालाही अशी सवय असेल, तर सावधान!

आजच्या धावपळीच्या युगात लॅपटॉप हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. ऑफिसचे काम असो किंवा करमणूक, तासनतास लॅपटॉपसमोर बसणे ही आता सवय झाली आहे. मात्र, अनेकदा आपण आरामाच्या नादात लॅपटॉप बेडवर, उशीवर किंवा अगदी अंगावर ब्लँकेट घेऊन वापरतो. जर तुम्हालाही अशी सवय असेल, तर सावधान! तुमची ही एक छोटीशी चूक तुमच्या महागड्या लॅपटॉपचे नुकसान तर करेलच, पण सोबतच मोठ्या अपघातालाही आमंत्रण देऊ शकते.

तांत्रिक तज्ज्ञांच्या मते, लॅपटॉपच्या खालच्या बाजूला आणि कडांना छोटे 'व्हेंट्स' असतात. या छिद्रांचे मुख्य काम लॅपटॉपच्या आतील गरम हवा बाहेर काढणे हे असते. जेव्हा आपण लॅपटॉप गादी, उशी किंवा ब्लँकेटसारख्या मऊ पृष्ठभागावर ठेवतो, तेव्हा हे व्हेंट्स पूर्णपणे झाकले जातात. परिणामी, लॅपटॉपमधील उष्णता बाहेर पडू शकत नाही आणि मशिनच्या आतील तापमान झपाट्याने वाढू लागते.

वाढलेल्या तापमानाचा सर्वाधिक फटका लॅपटॉपच्या बॅटरीला बसतो. लॅपटॉपची बॅटरी ठराविक मर्यादेपेक्षा जास्त उष्णता सहन करू शकत नाही. सततच्या गरम होण्यामुळे बॅटरी फुगण्याची शक्यता असते आणि अत्यंत गंभीर परिस्थितीत बॅटरीचा स्फोट होऊन आग लागण्याचाही धोका निर्माण होतो. विशेषतः लॅपटॉपवर जड काम करत असताना तो मऊ जागी ठेवणे म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे.

बेडवर लॅपटॉप वापरल्याने केवळ उष्णतेचाच प्रश्न निर्माण होतो असे नाही, तर बेडवरील धुलीकण आणि कपड्यांचे अतिसूक्ष्म धागे लॅपटॉपचा फॅन आत ओढून घेतो. यामुळे लॅपटॉपची कूलिंग सिस्टिम जाम होते आणि कालांतराने लॅपटॉपची गती मंदावते.

लॅपटॉप नेहमी टेबल किंवा कोणत्याही सपाट आणि कडक पृष्ठभागावर ठेवूनच वापरावा. लॅपटॉप स्टँडचा वापर करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे, ज्यामुळे हवा खेळती राहते. जर तुम्हाला जास्त वेळ काम करायचे असेल, तर 'कूलिंग पॅड' वापरावा. लॅपटॉप गरम होत असेल, तर तो थोडा वेळ बंद करून विश्रांती द्यावी.

तुमचा एक छोटासा निष्काळजीपणा तुमचे आर्थिक नुकसान तर करेलच, पण घरातील सुरक्षिततेलाही बाधा पोहोचवू शकतो. त्यामुळे आजच तुमची लॅपटॉप वापरण्याची पद्धत बदला!

















