सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 19:34 IST2026-05-02T19:32:59+5:302026-05-02T19:34:10+5:30
Barrier-less tolling system India: नितीन गडकरी यांनी गुजरातमध्ये देशातील पहिली मल्टी-लेन फ्री फ्लो (MLFF) टोलिंग सिस्टिम सुरू केली आहे. आता १२० च्या स्पीडने गाडी चालवली तरी टोल आपोआप कापला जाईल.

सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
भारतीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी भारताची पहिली 'मल्टी-लेन फ्री फ्लो' बॅरियर-लेस टोलिंग सिस्टिम लॉन्च केली. गुजरात मधील NH-48 वरील सुरत-भरूच सेक्शनमधील चोर्यासी टोल प्लाझा येथे हा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
पारंपारिक टोल नाक्यांवर वाहनांना थांबवण्यासाठी फिजिकल बॅरियर (दांडा) असतात. मात्र, या नवीन प्रणालीत कोणताही अडथळा नसेल. रस्त्याच्या वर एक ओव्हरहेड फ्रेम बसवण्यात आली आहे, जी सेन्सर आणि हाय-टेक एआय कॅमेऱ्यांनी सज्ज आहे.
१२० च्या स्पीडने गाडी गेली तरी टोल कापला जाणार!
या सिस्टिमची सर्वात मोठी विशेषतः म्हणजे, जर एखादे वाहन १२० किमी प्रतितास वेगाने टोल पॉइंटवरून गेले, तरी देखील त्यावरील एआय कॅमेरे गाडीची नंबर प्लेट अचूक वाचू शकतील. हे तंत्रज्ञान FASTag आणि ANPR (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन) यांच्या संगमावर आधारित आहे. गाडी टोल खालून जाताच आरएफआयडी रीडर फास्टॅग स्कॅन करेल आणि खात्यातून पैसे आपोआप वजा होतील.
फास्टॅग नसेल तर काय होणार?
ज्या गाड्यांकडे फास्टॅग नसेल किंवा तो काम करत नसेल, अशा वाहनांची ओळख नंबर प्लेटवरून एआय कॅमेराद्वारे पटवली जाईल. त्यानंतर संबंधित वाहन मालकाला थेट ई-नोटीस पाठवली जाईल.
प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत
या अत्याधुनिक प्रणालीमुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी पूर्णपणे नष्ट होईल. यामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होईल. वाहनांचे इंधन वाचेल आणि प्रदूषण कमी होईल. टोल नाक्यांवर मानवी हस्तक्षेपाची गरज भासणार नाही. भारताच्या टोलिंग सिस्टिमला जागतिक दर्जावर नेण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.