कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 19:44 IST2026-05-02T19:44:08+5:302026-05-02T19:44:38+5:30

कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कलिंगड साठले; शेतकरी आणि विक्रेता झाला हवालदिल

Customers turn their backs on Kalingada! 12 trucks of Kalingada's goods are lying empty after the accident in Mumbai | कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून

कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून

कल्याण : मुंबईत एका कुटुंबाने बिर्याणी सेवनानंतर कलिंगड खाल्ले. त्यानंतर कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर कलिंगड विक्रेता आणि शेतकरी यांना मोठा फटका बसला आहे. कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत लाखो रुपायांचा माल चार दिवसापासून पडून आहे. कलिंगडाच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने शेतकरी आणि विक्रेते हवालदिल झाले आहे. त्यांचा माल सडल्याने तो फेकून देण्याची वेळ आली आहे. 

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज कोट्यावधी रुपयांची फळांचा आवक होत असते. विविध प्रकारची फले बाजारात घाऊक विक्रीसाठी येतात. त्यात चिकू, आंबा, जांभळे, सफरचंद, केळी, डाळिंब, फणस, अननस, पेरु आदी फळे येतात. सध्या उन्हाळा असल्याने उन्हाची काहिली मिटवण्यासाठी कलिंगडाला ग्राहकांची जास्त पसंती आहे. बाजारात १० ते १२ ट्रक कलिंगडाचा माल विक्रीसाठी आला आहे. मुंबईतील घटनेनंतर कलिंगड खाण्याकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारात कलिंगडाच्या मालाला उठाव नाही. त्यामुळे कलिंगडाचा माल पडून आहे. 

गेल्या चार दिवसापासून हा माल ट्रकमध्ये पडून असल्याने त्यापैकी काही माल खराब होत आहे. मुंबईतील घटना होण्यापूर्वी किरकोळ बाजारात कलिगंड ५० रुपये किलो दराने विकले जात होते. लहान आकाराच्या कलिंगडाला ५० रुपये किलोचा भाव होता. बड्या आकाराच्या कलिंगडाला ८० ते १०० रुपये किलो दराचा भाव होता. घाऊक बाजारात कलिगंड विकले जात होते. दूरवरून कलिंगडचा माल घेऊन आलेले ट्रक चालक हवाल दिल झाले आहे. मालाला उठाव नसल्याने मालाचा उत्पादन खर्च तसेच वाहतूकीचा खर्च देखील निघणार नाही. त्यामुळे गाडीचा हप्ता कुठून भरायचा असा प्रश्न वाहन चालकांना सतावित आहेत. 

उन्हाळ्यात कलिंगडाचा माल मोठ्या प्रमाणात विकला जाईल. चार पैसै शेतकरी आणि विक्रेत्यांना मिळतील अशी मोठी आशा शेतकरी आणि विक्रेत्यांना होती. त्या आशेवर आत्ता पाणी फिरले आहे. मुंबईतील घटनेनंतर कलिंगड खाण्याविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत झालेले मृत्यू हे कलिंगड खाल्ल्याने झालेले नाहीत असा निर्वाळा दिला आहे. तसेच वैद्यकीय तज्ज्ञांनीही नागरिकांनी न घाबरता फळांचा आस्वाद घ्यावा असे म्हटले आहे. तरी देखील नागरीकांच्या मनातील भिती जात नसल्याने त्याचा फटका कलिंगड विक्रेते आणि शेतकरी यांना बसला आहे.

Web Title: Customers turn their backs on Kalingada! 12 trucks of Kalingada's goods are lying empty after the accident in Mumbai

टॅग्स :kalyanकल्याण