नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 20:13 IST2026-05-02T20:13:17+5:302026-05-02T20:13:44+5:30
Pune crime : सिंहगड रस्त्याकडून नवले पुलाच्या दिशेने जाणारा मार्ग पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केला. त्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
पुणे - भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी ६५ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले असून, घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. शुक्रवारी रात्री उशिरापासून नागरिकांनी पुणे-सातारा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. शनिवारी सकाळी नसरापूर परिसरात बंद पाळण्यात आला तसेच ग्रामस्थांनी मोर्चा काढत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
अधिकच्या माहितीनुसार मृत बालिकेचा मृतदेह घेऊन आलेली रुग्णवाहिका नवले पुलाजवळ पोहोचताच संतप्त नागरिक मोठ्या संख्येने महामार्गावर उतरले. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील स्वरणा हॉटेलसमोरील रस्ता दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला. आंदोलकांनी आरोपीला फाशी द्या, बाळाला न्याय मिळाल्याशिवाय रस्ता मोकळा होणार नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळी यावे, अशी मागणीही आंदोलकांकडून करण्यात आली.
दरम्यान, रास्ता रोकोमुळे मुंबईकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सिंहगड रस्त्याकडून नवले पुलाच्या दिशेने जाणारा मार्ग पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केला. त्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांना शांत करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत.
आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी
घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. बालिकेच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी कठोर कायदे आणि जलद न्यायप्रक्रियेची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.