Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 21:25 IST2026-05-02T21:10:43+5:302026-05-02T21:25:47+5:30
हवामान बदल आणि वाढत्या जागतिक तापमानामुळे समुद्राची पातळी धोक्याच्या पातळीबाहेर गेली आहे. निसर्गाचं हे रौद्ररूप जगाचा नकाशा बदलून टाकण्याच्या तयारीत असून, अनेक सुंदर द्वीपसमूह आता जलसमाधी घेण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत.

निसर्गाच्या सौंदर्याची खाण म्हणून ओळखले जाणारे अनेक छोटे देश आज आपल्या अस्तित्वाच्या सर्वात मोठ्या संकटाशी झुंज देत आहेत. ग्लोबल वॉर्मिंगचा वेग पाहता, येत्या काही दशकांत मालदीव, तुवालु आणि किरीबाती यांसारखी राष्ट्रे जगाच्या नकाशावरून कायमची पुसली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हे केवळ पर्यावरणाचे संकट नसून, एका संपूर्ण संस्कृतीच्या आणि इतिहासाच्या अंताची सुरुवात आहे.

जगातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेला 'मालदीव' हा देश समुद्रसपाटीपासून सरासरी अवघ्या १.५ मीटर उंचीवर आहे. नॅशनल जियोग्राफिकच्या अहवालानुसार, जर समुद्राच्या पाणी पातळीत अशीच वाढ होत राहिली, तर २०५० पर्यंत मालदीवचा ८० टक्क्यांहून अधिक भूभाग पाण्याखाली गेलेला असेल. येथील रहिवाशांना आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागणार आहे, जे जागतिक स्तरावर एक मोठे आव्हान ठरेल.

'मार्शल आयलँड्स'साठी समुद्राची पातळी केवळ १ मीटरने वाढणे म्हणजे मृत्यूचा सांगावा ठरण्यासारखे आहे. राजधानी माजुरो येथील ४० टक्के इमारती कायमस्वरूपी समुद्रात बुडू शकतात. तसेच, दक्षिण प्रशांत महासागरातील 'वानुअतु' हा देश देखील २१०० पर्यंत जलसमाधी घेण्याच्या उंबरठ्यावर आहे. हे देश केवळ आपली जमीन गमावत नसून, त्यांची हजारो वर्षांची परंपरा आणि ओळख लाटांच्या गर्तेत हरवून जाण्याची भीती आहे.

अशीच काहीशी भीषण परिस्थिती 'तुवालु' या देशाची आहे. एका अंदाजानुसार, २१०० सालापर्यंत भरतीच्या वेळी तुवालुचा ९५ टक्के भाग पाण्याखाली गेलेला असेल. येथील नागरिक आज आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या अस्तित्वासाठी मदतीची याचना करत आहेत, मात्र निसर्गाचा कोप थांबायला तयार नाही.

प्रशांत महासागरात वसलेला 'किरीबाती' हा ३३ प्रवाल द्वीपांचा (कोरल आयलँड्स) समूह आज अत्यंत नाजूक स्थितीत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, येत्या ३० ते ४० वर्षांत हा देश पूर्णपणे मानवरहित होऊ शकतो. समुद्राच्या लाटा येथील जमिनीला हळूहळू गिळंकृत करत आहेत.

समुद्राची पातळी वाढण्यामागे दोन मुख्य कारणे आहेत: ध्रुवीय प्रदेशातील बर्फाचे वेगाने वितळणे आणि वाढत्या उष्णतेमुळे महासागरातील पाण्याचे प्रसरण (थर्मल एक्सपेंशन). २०१३ ते २०२२ दरम्यान समुद्र पातळी दरवर्षी ४.६२ मिमी वेगाने वाढली आहे. 'किंग टाईड्स' म्हणजेच अत्यंत उंच लाटांमुळे आता किनारपट्टीची मोठ्या प्रमाणावर धूप होत असून महापूर येत आहेत.

















