केंद्र सरकार पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण १०-२०% वरून थेट ८५% पर्यंत वाढवण्याच्या तयारीत असतानाच, शेअर बाजारात एका शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे सुपुत्र निखिल गडकरी यांच्या 'सियान ॲग्रो इंडस्ट्रीज' या कंपनीचे शेअर्स गेल्या महिनाभरापासून दररोज 'अप्पर सर्किट' गाठत आहेत.
इथेनॉल उत्पादनावर लक्ष केंद्रित केल्यापासून सियान ॲग्रोच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या एका महिन्यापासून हा शेअर सातत्याने ५% च्या अप्पर सर्किटवर बंद होत आहे. एप्रिल २०२६ च्या सुरुवातीला ६०० रुपयांवर असलेला हा शेअर आता वेगाने आपल्या ऐतिहासिक उच्चांकाकडे (३६०० रुपये) कूच करत आहे. गेल्या पाच वर्षांत या कंपनीने गुंतवणूकदारांना तब्बल ४०००% पेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे.
काय करते ही कंपनी?
निखिल गडकरी या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही कंपनी प्रामुख्याने एफएमसीजी, खाद्यतेल, मसाले आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र, २०२४ मध्ये कंपनीने इथेनॉल उत्पादनात प्रवेश केल्यापासून तिच्या नफ्यात प्रचंड वाढ झाली आहे. कंपनी आपले इथेनॉल IOC, BPCL आणि HPCL सारख्या बड्या सरकारी तेल कंपन्यांना टेंडरद्वारे विकते. सध्या देशाच्या एकूण उत्पादनात या कंपनीचा वाटा ०.५% असला तरी, आगामी काळात क्षमता वाढवण्यावर भर दिला जात आहे.
नफ्यात ७४० टक्क्यांची मोठी वाढ
आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीच्या कामगिरीने सर्वांना थक्क केले आहे. कंपनीचा महसूल ४७७ टक्क्यांनी वाढून १०५४ कोटी रुपयांवर पोहोचला, तर नफा ७४० टक्क्यांनी वाढून ४१ कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.
