एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 14:17 IST2026-05-02T14:17:02+5:302026-05-02T14:17:45+5:30
राजस्थान पोलीस दलातील वरिष्ठ IPS अधिकारी काळूराम रावत सुट्टीचा मेसेज पाठवून अचानक बेपत्ता झाले आहेत. ACB मध्ये कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
जयपूर: राजस्थान पोलीस दलातून एक धक्कादायक आणि अनाकलनीय घटना समोर आली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक ब्युरोमध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी काळूराम रावत हे अचानक बेपत्ता झाले आहेत. ताप आल्याने येऊ शकत नाही, असे एक दिवसाची सुट्टी घेतलेले रावत परतलेच नाहीत, त्यामुळे पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएस काळूराम रावत यांनी १२ जानेवारीला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व्हॉट्सअॅपवर मेसेज करून एक दिवसाची सुट्टी हवी असल्याचे कळवले होते. ताप आल्याने कामावर येऊ शकत नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. ताप ओसरला की ते कामावर येतील असे पोलिसांना वाटले. मात्र, एक, दोन दिवस झाले तरीही ते कर्तव्यावर रुजू झाले नाहीत. या काळात त्यांचे बढती आणि बदली देखील झाली. परंतू, त्या विभागात देखील ते साडे तीन महिने झाले तरी आधीचा कारभार सोडून हजर झाले नाहीत. यानंतर पोलिसांच्या हालचाली सुरु झाल्या.
कोणताही संपर्क होऊ शकला नाही...
रावत यांचा मोबाईल फोन सतत 'स्विच्ड ऑफ' येत असल्याने पोलिस विभागाची चिंता वाढली आहे. रावत यांचा शोध घेण्यासाठी राजस्थान पोलिसांनी तातडीने शोध पथके तयार केली असून विविध ठिकाणी त्यांचा शोध घेतला जात आहे. ते स्वेच्छेने कोठे गेले आहेत की यामागे काही वेगळे कारण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही.
कोण आहेत काळूराम रावत?
काळूराम रावत हे राजस्थान केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे अशा प्रकारे बेपत्ता होणे ही पोलीस विभागासाठी चिंतेची बाब ठरत आहे.