भारतीय गुंतवणूक बाजारपेठेत आता तो काळ मागे पडला आहे जेव्हा शेअर बाजार म्हणजे केवळ थेट शेअर्स खरेदी करणं किंवा म्युच्युअल फंडापुरता मर्यादित होता. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या आकडेवारीनं हे सिद्ध केलंय की, भारतीय गुंतवणूकदार आता पारंपारिक मार्ग सोडून नवीन पर्यायांचा वेगाने स्वीकार करत आहेत.
झिरोदा फंड हाउसच्या (Zerodha Fund House) ताज्या रिपोर्टनुसार, आर्थिक वर्ष २६ मध्ये भारतीय एक्स्चेंज ट्रेडेड फंड म्हणजेच ईटीएफ (ETF) मध्ये ₹१.८१ लाख कोटींहून अधिक निव्वळ गुंतवणूक आली आहे. ईटीएफमधील या तुफान गुंतवणुकीचं मुख्य कारण म्हणजे कमोडिटी ईटीएफबद्दल गुंतवणूकदारांमध्ये असलेले आकर्षण. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ईटीएफमध्ये आलेल्या एकूण गुंतवणुकीचा मोठा हिस्सा गोल्ड आणि सिल्वर ईटीएफचा राहिला आहे.
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
ही वाढ किती मोठी आहे, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की यापूर्वीचा विक्रम आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ₹८३,३९० कोटींचा होता. म्हणजेच यावर्षी गुंतवणूकदारांनी मागील विक्रमाच्या तुलनेत दुप्पटहून अधिक पैसा ईटीएफमध्ये गुंतवला आहे. गेल्या पाच वर्षांत (FY21-FY25) गुंतवणुकीची पातळी ₹४६,००० कोटी ते ₹८३,००० कोटींच्या दरम्यान राहिली होती, मात्र यावेळी बाजारपेठेनं सर्व विक्रम मोडीत काढलेत.
सोन्या-चांदीची चमक वाढली
रिपोर्टनुसार, भारतीय आता केवळ इक्विटी किंवा शेअर्सच्या मागे धावत नाहीत, तर कमोडिटी ईटीएफ सुद्धा आता त्यांची पसंती बनलेत. गेल्या आर्थिक वर्षात गोल्ड ईटीएफमध्ये ₹६८,८६८ कोटींची गुंतवणूक झाली. तर सिल्वर ईटीएफमध्ये ₹३०,४१२ कोटींची गुंतवणूक आली. या दोघांमध्ये मिळून एकूण ₹९९,२८० कोटींची गुंतवणूक झाली, जी एकूण ईटीएफ इनफ्लोच्या सुमारे ५५% होती. इक्विटी ईटीएफचा हिस्सा सुमारे ४३% राहिला. भारतीयांनी शेअर आधारित ईटीएफपेक्षा सोने आणि चांदीवर अधिक विश्वास दाखवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
जेरोधा फंड हाउसचे विशाल जैन यांच्या मते, भारतीय गुंतवणूकदार आता आपला पोर्टफोलिओ केवळ शेअर्सपुरता मर्यादित न ठेवता अधिक डाइवर्सिफाइड (विविधपूर्ण) बनवत आहेत. गेल्या पाच वर्षांत (FY21-FY25) गोल्ड ईटीएफमध्ये एकूण जेवढी गुंतवणूक झाली होती, त्यापेक्षा दुप्पट पैसा एकट्या या एका वर्षात आला आहे. सोन्याच्या वाढत्या किमती आणि सुरक्षित गुंतवणुकीचा शोध यामुळे हे आकर्षण नव्या उंचीवर पोहोचले आहे.
डिजिटल चांदीची मोठी खरेदी
चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठीही हे वर्ष ऐतिहासिक ठरलं. २०२२ मध्ये सुरू झालेल्या सिल्वर ईटीएफनं अवघ्या तीन-चार वर्षांत ₹३०,००० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गुंतवणूकदारांच्या या आकर्षणामागे 'टॅक्स' हे एक मोठं कारण आहे. फिजिकल गोल्ड ठेवल्यावर जिथे लॉंग-टर्म कॅपिटल गेन टॅक्ससाठी २४ महिने वाट पाहावी लागते, तिथे गोल्ड आणि सिल्वर ईटीएफमध्ये हा लाभ अवघ्या १२ महिन्यांत मिळतो.
दैनंदिन व्यवहारांत मोठी वाढ
आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ईटीएफचा सरासरी दैनंदिन व्यवहार केवळ ₹२३७ कोटी होता, जो आता वाढून ₹४,२९० कोटी प्रति दिवसापेक्षा अधिक झाला आहे. यामध्ये सर्वात मोठा वाटा कमोडिटी ईटीएफचा आहे, जिथे दररोज सुमारे ₹२,७०० कोटींचे ट्रेडिंग होत आहे. जानेवारी २०२६ मध्ये नोंदवण्यात आलेली ₹३९,००० कोटींची मासिक विक्रमी खरेदी, भारतीय गुंतवणूकदार आता बाजारातील चढ-उतारांना सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं स्पष्ट करत आहे.
