Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपी ७ मेपर्यंत कोठडीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 18:08 IST2026-05-02T18:06:53+5:302026-05-02T18:08:43+5:30
Pune crime - या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर शनिवारी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपी ७ मेपर्यंत कोठडीत
पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर गावात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. सुटीसाठी आजीकडे आलेल्या चिमुरडीला ‘वासरू दाखवतो’ असे सांगून गोठ्याकडे नेण्यात आले आणि त्यानंतर तिच्यावर अमानुष अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप ६५ वर्षीय भिमराव कांबळे याच्यावर आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर शनिवारी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाने तपासासाठी अधिक वेळ मागितल्यानंतर न्यायालयाने आरोपीला ७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तपासादरम्यान आरोपीविरोधात यापूर्वीही महिलांच्या लैंगिक छळाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. एका प्रकरणात त्याने शिक्षा भोगल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, नसरापूर गावात नागरिकांनी कडकडीत बंद पाळत घटनेचा निषेध व्यक्त केला. गावकऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांनी आरोपीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. न्यायालय परिसरातही आंदोलनकर्त्यांनी आरोपीची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. “महिला आणि मुलींवरील अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी मागणी आंदोलकांनी केली.काही संघटनांनी राज्य सरकारने अशा प्रकरणांमध्ये जलदगतीने निर्णय घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. या घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.