Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 12:44 IST2026-05-03T12:40:44+5:302026-05-03T12:44:00+5:30

Devendra Fadnavis And Nasrapur Bhor Crime : राजगड पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Devendra Fadnavis reaction over Pune Nasrapur Bhor Crime navale bridge rasta roko | Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

पुण्याच्या नसरापूरमध्ये एका साडेतीन वर्षीय चिमुरडीवर ६५ वर्षांच्या नराधमाने अत्याचार करून खून केला. क्रूरतेचा कळस म्हणजे दगडाने ठेचलेला मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. संतप्त ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्गावर शुक्रवारी रात्री आंदोलन केलं. त्यानंतर शनिवारी मोर्चा काढून बंद पुकारला. या प्रकरणी राजगड पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

"नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे. पण ते लोकशाहीत करता येत नाही. काही लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो, त्यांनी परिस्थिती समजून घेतली. आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. काही लोक त्यांनाही जाऊ देत नव्हते. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होते" अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. "मी काल स्वत: पीडितेच्या वडिलांशी दोनवेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं, आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करुन घ्यायची आहे. त्यासाठी वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं, याकरता माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेत आहोत."

लेकीच्या विरहाने धायरीचा आसमंत सुन्न, न्यायासाठी कुटुंबीयांचा आक्रोश..!

"नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे"

"लोकशाहीत आपल्या सगळ्यांना वाटतं, अशा नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे. पण ते लोकशाहीत करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते. पण कोणालाही कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये, यादृष्टीने कोणताही कोणतीही पळवाट न ठेवता या नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल याचा प्रयत्न राज्य सरकार करेल. न्यायालयातून हे प्रकरण वेगाने मार्गी लावलं जाईल. तसं लेखी पत्र आम्ही पीडितेच्या कुटुंबाला दिलं आहे. ही घटना गंभीर आहे, रोष साहजिक आहे. नागरिकांचा रोष असणं काही चुकीचं नाही" असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

"मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो"

"काही लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो, त्यांनी परिस्थिती समजून घेतली. त्यानंतर पोलीस आयुक्तांशी चर्चा करुन त्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने काही लोक त्यांनाही जाऊ देत नव्हते. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होते. ते लोक कोण आहेत, हे लक्षात आले आहे. मात्र मुलीच्या वडिलांनी जी काही भूमिका घेतली, त्यासाठी मी आभारी आहे. कुटुंबाच्या पाठीशी आहोत. आम्ही आरोपीवर यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यांचीही माहिती घेत आहोत. मात्र या गुन्ह्यातून तो बाहेर येऊच शकत नाही" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल

नसरापूर अत्याचार प्रकरण घटनाक्रम

शुक्रवार दु. ३ वा. पीडित चिमुकली शेवटची राम मंदिर भागात दिसली.
दु. ३:४५ वा. मुलगी घरी न आल्याने आजीकडून मुलीचा शोध सुरू.
दु. ४ वा. ग्रामस्थांकडून शोध सुरू.
दुपारी ४:३० वा. सीसीटीव्ही शोधले तेव्हा आरोपी मुलीला गोठ्याकडे घेऊन जाताना स्पष्टपणे दिसला.
संध्या. ५:३० वा. ग्रामस्थांनी आरोपीला बनेश्वर फाट्यावरून पकडून आणला, चोप मिळताच आरोपीने मुलीचा मृतदेह लपवलेली जागा सांगितली. आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.
सायं. ६ वा. शेणाच्या ढिगाऱ्यातून चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढताच गावकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक.
संध्या. ७ वा. ग्रामस्थांनी पोलिसांना जागेवरच घेराव घातला. वादानंतर पोलिसांनी मृतदेह हलवला.
रात्री ८:०० वा. ग्रामस्थांचा राजगड पोलिस स्टेशनला घेराव.
रात्री ९:०० वा. गावकऱ्यांनी पुणे-बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको केल्याने वाहतूक कोंडी झाली.
रात्री ११ वा. एसपी गिल दाखल झाले. लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी रास्तारोको मागे घेतला.
शनिवार सकाळी ७:०० वा. नसरापुरात कडकडीत बंद.

Web Title : नसरापुर बलात्कार-हत्या: फडणवीस ने न्याय का आह्वान किया, जन आक्रोश को स्वीकारा।

Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस ने नसरापुर बलात्कार-हत्या को संबोधित करते हुए त्वरित न्याय का आश्वासन दिया और जघन्य अपराध की निंदा की। उन्होंने पीड़िता के पिता को स्थिति को समझने के लिए धन्यवाद दिया, और सरकार ने अपराधी को अधिकतम सजा दिलाने का वादा किया।

Web Title : Nasrapur Rape-Murder: Fadnavis calls for justice, acknowledges public anger.

Web Summary : CM Fadnavis addressed the Nasrapur rape-murder, assuring fast-track justice and condemning the heinous crime. He thanked the victim's father for understanding the situation amid attempts to exploit it. The government pledges maximum punishment for the perpetrator.