नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 12:48 IST2026-05-03T12:43:32+5:302026-05-03T12:48:00+5:30
Pune Crime - उन्हाळ्याच्या सुटीसाठी आई-वडिलांसोबत आजोळी आलेल्या चिमुकलीला आरोपीने “वासरू दाखवतो” असे सांगत गोठ्याकडे नेले.

नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
पुणे / नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होत आहे.
उन्हाळ्याच्या सुटीसाठी आई-वडिलांसोबत आजोळी आलेल्या चिमुकलीला आरोपीने “वासरू दाखवतो” असे सांगत गोठ्याकडे नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आली. इतकेच नव्हे तर पुरावे लपवण्यासाठी आरोपीने मृतदेह गोठ्यातील शेणात पुरल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भीमराव कांबळे (वय ६५, रा. साळवडे, ता. भोर) याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. गावात शोककळा पसरली असून नागरिकांकडून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
या घटनेनंतर पीडित मुलीच्या वडिलांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, माझ्या मुलीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय व्यक्तीने आमच्या घरी येऊ नये. या दरम्यानचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पीडित कुटुंबाच्या या भूमिकेमुळे समाजात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक सामाजिक संघटना आणि नागरिकांनी कुटुंबाच्या भावनांना पाठिंबा दर्शवला आहे. नागरिकांकडून आरोपीस फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
नसरापूर अत्याचार प्रकरण घटनाक्रम
शुक्रवार दु. ३ वा. पीडित चिमुकली शेवटची राम मंदिर भागात दिसली.
दु. ३:४५ वा. मुलगी घरी न आल्याने आजीकडून मुलीचा शोध सुरू.
दु. ४ वा. ग्रामस्थांकडून शोध सुरू.
दुपारी ४:३० वा. सीसीटीव्ही शोधले तेव्हा आरोपी मुलीला गोठ्याकडे घेऊन जाताना स्पष्टपणे दिसला.
संध्या. ५:३० वा. ग्रामस्थांनी आरोपीला बनेश्वर फाट्यावरून पकडून आणला, चोप मिळताच आरोपीने मुलीचा मृतदेह लपवलेली जागा सांगितली. आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.
सायं. ६ वा. शेणाच्या ढिगाऱ्यातून चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढताच गावकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक.
संध्या. ७ वा. ग्रामस्थांनी पोलिसांना जागेवरच घेराव घातला. वादानंतर पोलिसांनी मृतदेह हलवला.
रात्री ८:०० वा. ग्रामस्थांचा राजगड पोलिस स्टेशनला घेराव.
रात्री ९:०० वा. गावकऱ्यांनी पुणे-बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको केल्याने वाहतूक कोंडी झाली.
रात्री ११ वा. एसपी गिल दाखल झाले. लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी रास्तारोको मागे घेतला.
शनिवार सकाळी ७:०० वा. नसरापुरात कडकडीत बंद.