पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 14:01 IST2026-05-03T14:00:44+5:302026-05-03T14:01:05+5:30
सूरज पांडुरंग फाले या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला

पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
म्हासुर्ली - कोनोली तर्फ असंडोलीपैकी फाल्याचा धनगरवाडा (ता. राधानगरी) येथे पूर्ववैमनस्यातून मानेवर धारदार हत्याराने खोलवर वार करून तसेच डोक्यात वर्मी घाव घालून सूरज पांडुरंग फाले (वय ३५. सध्या रा. राजारामपुरी, कोल्हापूर) या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. तसेच त्याची पत्नी सोनिया पाटील (वय ३०) गंभीर जखमी झाली आहे. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून, यातील तीन आरोपी स्वताहून राधानगरी पोलिसांत हजर झाले आहेत.
मूळ फालेवाडा येथील रहिवासी असणारा सूरज हा शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास पत्नीसह कोल्हापूरहून येथे आला होता. त्याचवेळी सध्या कोल्हापूर येथे राहणारे आरोपी आपल्या मूळ घरी आले होते. त्यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाला आणि वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन घरासमोरील शेतात खुनाचा प्रकार घडला. यावेळी सूरज याची पत्नी वाद सोडविण्यासाठी गेली असता तिच्याही डोक्यात मार बसल्याने गंभीर जखमी झाली. यातील आरोपी धोंडीराम बापू फाले, दगड्डू बापू फाले, बाबू ज्ञानू फाले हे राधानगरी पोलिसांत हजर झाले आहेत. मात्र, गुन्ह्यातील आरोपींची संख्या किती होती हे अद्यापही अस्पष्ट आहे.
घटनास्थळावरील परिस्थिती एवढी विदारक होती की, मानेवर कोयत्याने खोलवर वार केल्याने रक्ताचे थारोळे साचले होते, तर डोक्यात वर्मी घाव बसल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. घटनास्थळी चार चारचाकीची तोडफोड करण्यात आली. या गाडीमध्ये एक बंदूक, तसेच दारूच्या बाटल्या पोलिसांना आढळून आल्या. घटनास्थळी राधानगरी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला.