पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 12:10 IST2026-05-03T12:09:23+5:302026-05-03T12:10:48+5:30
Sanjay Raut on Nasrapur Case: नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेवरून शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असतानाच, शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महायुती सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली. सरकार बहिणींच्या खात्यात १५०० रुपये टाकत आहे. मात्र, त्या बदल्यात सरकारने बहिणीच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या करण्याचा अधिकार कुणाला दिला आहे का? असा संतप्त सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत यांनी या घटनेला थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले आहे. ते म्हणाले की, "राज्यात महिलांवरील अत्याचार, हत्या आणि कायदा सुव्यवस्थेचे पूर्णपणे वाटोळे झाले आहे. गृहमंत्री म्हणून फडणवीस आपली कर्तव्ये पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. राज्यात लहान मुलांवर आणि महिलांवर अत्याचार वाढत असताना मुख्यमंत्री मात्र राजकारणात, प्रचार दौऱ्यात आणि टिवल्या-बावल्या करण्यात मग्न आहेत."
'लाडकी बहीण' योजनेवरून सरकारला घेरलं
संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेचा संदर्भ देत सरकारवर घणाघाती आरोप केला. "त्या चिमुकलीची आई कदाचित सरकारची लाडकी बहीण असेल. सरकार तिच्या खात्यात १५०० रुपये टाकत असेल. पण या १५०० रुपयांच्या बदल्यात त्या बहिणीच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या करण्याचा अधिकार कुणाला दिला आहे का?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
फडणवीस यांच्यावर सडकून टीका
संजय राऊत पुढे म्हणाले की, काल झालेल्या 'मिसिंग लिंक'च्या उद्घाटनावेळी झालेल्या वाहतूक कोंडीबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची माफी मागितली. यावर टोला लगावताना राऊत म्हणाले की, "वाहतूक कोंडीबद्दल माफी मागणारे फडणवीस नसरापूर प्रकरणावर का गप्प आहेत? त्यांनी या प्रकरणाबद्दल राज्याची माफी मागायला हवी होती. परंतु, राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत त्यांनी कधीच माफी मागितली नाही."
महिलांनी बंड करण्याचे आवाहन
संजय राऊत यांनी राज्यातील महिलांना सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. "पैशांचा माज आणि सत्तेच्या बळावर हे राज्य सुरू आहे. कायद्याचा धाक उरलेला नाही, म्हणूनच गुन्हेगारी वाढत आहे. राज्यातील महिलांनी आणि बहिणींनी या सरकारविरोधात बंड करून त्यांना जाब विचारला पाहिजे," असेही राऊत यावेळी म्हणाले.