२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 11:59 IST2026-05-03T11:57:22+5:302026-05-03T11:59:00+5:30
दिल्लीच्या शालीमार बाग परिसरात चोरीच्या एका खळबळजनक प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिला ही त्याच घरात काम करणारी मोलकरीण निघाली.

२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
दिल्लीच्या शालीमार बाग परिसरात चोरीच्या एका खळबळजनक प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिला ही त्याच घरात काम करणारी मोलकरीण निघाली. चोरी केल्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी तिने आपल्या घरात चक्क १५ हिंस्त्र कुत्रे पाळले होते. मात्र पोलिसांनी धाड टाकली असता ती घरात अंथरुणात लपली होती, जिथून तिला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्ब २ किलो सोने ट्रेस करण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ वर्षीय सोना उर्फ सोनिया एका घरात कामाला होती. एप्रिल महिन्यात त्या घरातून सोन्याचे दागिने आणि रक्कम चोरीला गेल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. सुरुवातीच्या तपासात घरातील नोकरांवर संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजने तपास केला असता सोनियाचं नाव समोर आलं.
१५ हिंस्त्र कुत्रे पाळले
तपासात असं निष्पन्न झालं की, सोनियाने संधी साधून घरातील दागिने आणि पैसे लंपास केली होती. चोरीनंतर ती फरार झाली आणि आपल्या घरी लपून राहू लागली. पोलिसांनी तिच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तिने घरात पिटबुल, अमेरिकन बुली आणि हायब्रिड जातीचे १५ हिंस्त्र कुत्रे पाळले होते. या कुत्र्यांमुळे कोणीही सहजासहजी घराच्या आत जाऊ शकत नव्हतं.
अंथरुणात लपली
छापेमारी करण्यापूर्वी पोलिसांनी चोख नियोजन केलं होतं. कुत्र्यांचा सामना करण्यासाठी आवश्यक तयारी करून पोलीस घरात शिरले. शोध सुरू असताना सोनिया घरात अंथरुणात लपलेली आढळली. पोलिसांनी तिला तातडीने ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान तिने धक्कादायक खुलासे केले. तिने चोरी केलेले दागिने वेगवेगळ्या बँका आणि फायनान्स कंपन्यांमध्ये गहाण ठेवून त्यावर ५ लाख रुपयांचे कर्ज घेतलं होतं. पोलिसांना आतापर्यंत अशा १५ गोल्ड लोन खात्यांची माहिती मिळाली आहे.
२ किलो सोनं
या तपासादरम्यान पोलिसांनी २ किलो सोनं ट्रेस केलं आहे. आरोपीचं बँक खातं गोठवण्यात आलं असून तिच्या इतर मालमत्तेची माहिती घेतली जात आहे. तिच्या घराझडतीत १ लाख रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या महिलेचा गुन्हेगारी इतिहास असून तिच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल आहेत. सध्या ती पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरू आहे.