"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 16:51 IST2026-05-03T16:46:07+5:302026-05-03T16:51:40+5:30

Nasrapur Case News: नसरापूर घटनेवरून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उमटली. या प्रकरणावर बोलताना अमित ठाकरे हे राज्य सरकारवर भडकले.

Give the police 24 hours, they will restore law and order in Maharashtra; Amit Thackeray criticizes Chief Minister Devendra Fadnavis over Nasrapur case | "माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले

"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले

"आता तरी सरकारचं डोकं ठिकाणावर येणार आहे की नाही?", असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी महायुती सरकारला घेरले. भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये येथील एका चिमुकलीवर झालेल्या घटनेनंतर अमित ठाकरे यांनी एक पोस्ट करत पोलीस खात्यातील राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित केला. 

अमित ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. "नसरापूरमध्ये त्या चिमुरडीसोबत जे घडलं, ते ऐकून मन सुन्न झालंय आणि डोकं रागाने भणभणतय. सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या ३-४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली जाते? ही कोणती विकृती आपण आपल्या समाजात आणि राज्यात पोसतोय?", असे सवाल करत अमित ठाकरे यांनी "महाराष्ट्रात आज माता-भगिनी सोडाच, पण लहान बाळंही सुरक्षित राहिलेली नाहीत, ही आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे", अशी खंत व्यक्त केली.  

ही लाचारी नाही, तर काय? 

"गेल्या काही महिन्यांतील घटनांची मालिका पाहिली तर अंगावर काटा येतो. नसरापूर, बदलापूर, ठाणे, पुणे, चाकण, महाळुंगे... अशा किती जागांची आणि किती निष्पापांची नावं आपण घ्यायची? प्रत्येक वेळी नवी घटना घडते, आपण दोन दिवस संताप व्यक्त करतो आणि तिसऱ्या दिवशी सगळं विसरून जातो. म्हणूनच पोर्शे अपघातात निबंध लिहून सुटका होते आणि नेस्कोमध्ये ओव्हरडोसमुळे जीव जाऊनही कोणतीच ठोस कारवाई होत नाही. ही व्यवस्थेची लाचारी नाही तर काय आहे?", असा संताप अमित ठाकरेंनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल व्यक्त केला. 

अमित ठाकरे सरकारला म्हणाले, 'तुमचे प्रशासन कोणासाठी काम करत आहे?'

"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं प्रशासन नक्की कोणासाठी काम करतंय? गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही, कारण त्यांना माहितीये की कोणत्या ना कोणत्या मंत्र्याचा वरदहस्त त्यांच्या पाठीशी आहे", असा गंभीर आरोप अमित ठाकरेंनी केला आहे. 

"शक्ती कायद्याच्या गप्पा खूप झाल्या, पण तो कायदा प्रत्यक्षात राबवण्याचं धाडस हे सरकार का दाखवत नाहीये? केवळ कागदावर कायदे करून किंवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 'लाडकी बहीण' योजना जाहीर करून बहिणी सुरक्षित होत नसतात; त्यांच्या सुरक्षिततेसाठी गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा दरारा निर्माण करावा लागतो", अशा शब्दात अमित ठाकरेंनी सरकारला सुनावले. 

'पोलिसांना फक्त २४ तास द्या'

"आज परिस्थिती इतकी भीषण आहे की, उद्या आपली मुलं घराबाहेर सुरक्षित असतील याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. सत्तेत बसलेले लोक १० दिवसांनी जुन्या घटना विसरून नवीन जाहिरातींमध्ये दंग होतात, पण पीडितांचे काय? माझं सरकारला पुन्हा सांगणं आहे, पोलिसांना फक्त २४ तासांचा 'फ्री हॅण्ड' द्या! आमचे पोलीस सक्षम आहेत, पण त्यांचे हात राजकीय हितसंबंधांनी बांधलेले आहेत", असे अमित ठाकरे म्हणाले. 

"लोकशाहीत आम्ही प्रत्येक गोष्ट सहन करतोय, पण हे सर्व सहन करण्याच्या पलीकडचे आहे. मी इथे एक 'नेता' म्हणून नाही, तर एक सामान्य 'माणूस' आणि एक बाप म्हणून जाब विचारतोय... आपल्या महाराष्ट्राला आपण कोणत्या थरावर नेऊन ठेवणार आहोत?", अशा शब्दात अमित ठाकरे यांनी महायुतीला सरकारला सवाल केला आहे.

Web Title : अमित ठाकरे ने नसरापुर घटना पर महाराष्ट्र सरकार की आलोचना की, जवाबदेही की मांग की।

Web Summary : अमित ठाकरे ने नसरापुर घटना के बाद सरकार की आलोचना करते हुए प्रशासनिक विफलता पर सवाल उठाए और पीड़ितों के लिए न्याय की मांग की। उन्होंने खाली वादों के बजाय कार्रवाई का आग्रह किया।

Web Title : Amit Thackeray Slams Maharashtra Government Over Nasrapur Incident, Demands Accountability.

Web Summary : Amit Thackeray criticizes the government after the Nasrapur incident, questioning administrative failures and demanding justice for victims. He urges action, not empty promises.