आंबट कैरी आणि झणझणीत मिरचीची जमवा जोडी, घ्या कैरी मिरचीच्या लोणच्याची चटपटीत रेसिपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2026 14:17 IST2026-04-22T14:10:51+5:302026-04-22T14:17:04+5:30

लोणच्याचे वेगवेगळे प्रकार खूप चवीने खाल्ले जातात. कारण साध्या जेवणालाही लोणचे प्रकारामुळे छान चव येते.कैरीचं लोणचं तर आपण नेहमीच खातो. तसेच मिरचीचं लोणचंही अनेक घरांमध्ये केलं जातं. आता मिरची आणि कैरी हे दोन्ही पदार्थ एकत्र करून एकदा त्याचं लोणचं करून खाऊन पाहा.. घरातल्या सगळ्यांनाच खूप आवडेल.(kairi- mirchi pickle recipe)

कैरी- मिरचीचं चटकदार लोणचं करण्यासाठी एक मध्यम आकाराची कैरी धुवून स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर ती किसून घ्या.(how to make kairi mirci loncha?)

हे लोणचं करण्यासाठी कमी तिखट असणाऱ्या मिरच्या घ्या. मिरच्याही धुवून कोरड्या करून घ्या आणि नंतर त्यांचे तुकडे करा. एका मिरचीचे साधारण २ ते ३ काप करावे. यानंतर किसलेली कैरी आणि मिरच्या एकत्र करा. त्यात चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालून ते अर्धा तास झाकून ठेवा.

त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये १ चमचा धणे, अर्धा चमचा जिरे, १ चमचा बडिशेप, १ चमचा मोहरी, ७ ते ८ काळे मीरे, ४ ते ५ लवंग असं सगळं एकत्र करून भाजून घ्या. थंड झाल्यानंतर मिक्सरमधून फिरवून बारीक करून घ्या.

तयार केलेला मसाला कैरी आणि मिरच्यांमध्ये घाला. त्यात अर्धा चमचा गूळ घाला. सगळं लोणचं व्यवस्थित हलवून घेतलं की कैरी- मिरचीचं इंस्टंट लोणचं तयार..

















