IPL 2026, Rajasthan Royals Beat Lucknow Super Giants By 40 Runs : रियान परागच्या अप्रतिम नेतृत्व कौशल्यासह गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर केलेल्या गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सच्या संघाने घरच्या मैदानात खेळणाऱ्या रिषभ पंतच्या लखनौ सुपर जाएंट्सला ४० धावांनी पराभूत केले. लखनौच्या संघावर सलग चौथ्या पराभवाची नामुष्की ओढावली. दुसरीकडे दोन पराभवानंतर दमदार कमबॅक करत राजस्थान रॉयल्सचा संघ सातव्या सामन्यातील पाचव्या विजयासह १० गुणांची कमाई करत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहचला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लखनौचा संघ १८ षटकात ११९ धावांवर ऑलआउट
लखनौच्या इकाना स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यावर रवींद्र जडेजाने २९ चेंडूत केलेल्या ४३ धाांच्या खेळीच्या जोरावर राजस्थानच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ बाद १५९ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना सलामीवीर मिचेल मार्शच्या अर्धशतकी खेळीशिवाय एकाचाही निभाव लागला नाही. परिणामी लखनौचा संघ १८ षटकात ११९ धावांतच आटोपला.
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
अर्धशतकाशिवाय संपला RR चा डाव; जड्डूची उपयुक्त खेळी
नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी जोडी लखनौच्या मैदानात खास छाप सोडण्यात अपयशी ठरली. यशस्वी जैस्वाल १२ चेंडूत २२ धावा करून परतल्यावर त्याच्या जागी आलेल्या ध्रुव जुरेल आल्या पावली माघारी फिरला. या दोन्ही विकेट्स शमीनं घेतल्या. रियान पराग १९ चेंडूत २० तर शिमरॉन हेटमायर १८ चेंडूत २२ धावा करून परतल्यावर रवींद्र जडेजाने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने २९ चेंडूत नाबाद ४३ धावांची खेळी करत फरेरा २० (१९) आणि शुभमन दुबे १९ (११) यांच्या साथीनं संघाच्या धावफलकावर निर्धारित २० षटकात ६ बाद १५९ धावा लावल्या. लघनौकडून गोलंदाजीत शमीशिवाय प्रिन्स यादव, मोहसिन खान यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.
मिचेल मार्शची अर्धशतकी खेळी ठरली व्यर्थ
राजस्थानने दिलेल्या १६० धावांचा पाठलाग करताना लखनौच्या संघाने पहिल्या तीन षटकात तीन विकेट्स गमावल्या. इथंच राजस्थानच्या संघाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली. आयुष बडोनी, कर्णधार रिषभ पंत आणि एडन मार्करम यांना खातेही उघडता आले नाही. ३ बाद ११ धावा अशी बिकट परिस्थिती असताना मिचेल मार्श आणि निकोलस पूरन जोडी जमली. दोघांनीचौथ्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी रचली. रवींद्र जडेजानं पूरनची विकेट घेत ही जोडी फोडली. तो २५ चेंडूत २२ धावा करून परतला. मिचेल मार्शनं ४१ चेंडूत ५५ धावा केल्या. नांद्रे बर्गरनं त्याची विकेट घेत सामना राजस्थानच्या बाजून वळवला. हिमंत सिंगने १५ चेंडूत केलेल्या १५ धावा वगळता तळातील एकाही बॅटरला दुहेरी आकडा गाठता आला नाही. राजस्थानकडून गोलंदाजीत जोफ्रा आर्चरनं सर्वाधिक ३ तर नांद्रे बर्गर आणि ब्रिजेश शर्मा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. जडेजासह रवी बिश्नोईन प्रत्येकी १-१ विकेट घेत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
रियानची कमालीची कॅप्टन्सी
राजस्थानच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यात योग्य वेळी कर्णधार रियान परागने खेळलेली योग्य चाल हा मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. आतापर्यंत जड्डूला दोन तीन षटके करून थांबवणाऱ्या रियान परागनं या सामन्यात त्याच्याकडून ४ षटके टाकून घेतली. मोक्याच्या क्षणी बर्गर आणि ब्रिजेशचा केलेला योग्य वापर आणि त्यांच्या गोलंदाजीवर योग्य रणनितीसह खेळलेला डावामुळेच राजस्थानच्या संघाने लखनौला त्यांच्या घरच्या मैदानात रोखून दाखवलं.