ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 23:10 IST2026-04-22T23:09:18+5:302026-04-22T23:10:40+5:30
रशिया-युक्रेन युद्धात नवा ट्विस्ट! युक्रेनकडून ट्रम्प यांना खूश करण्यासाठी 'डोनीलँड' प्रस्तावाची चर्चा.

ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
रशिया-युक्रेन युद्धाला चार वर्षे उलटूनही अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यातच अमेरिकेच्या व्हाइट हाउसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुनरागमनानंतर युक्रेनला मिळणाऱ्या लष्करी मदतीत कपात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे समर्थन पुन्हा मिळवण्यासाठी युक्रेनने एक अत्यंत वेगळा आणि चर्चेचा विषय ठरणारा मार्ग स्वीकारला आहे. डोनबास भागातील एका मोठ्या भूभागाचे नामकरण थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावरून 'डोनीलँड' करण्याचा प्रस्ताव युक्रेनने दिल्याची चर्चा आता जागतिक राजकारणात रंगली आहे.
'डोनीलँड'ची कल्पना काय?
'द न्यूयॉर्क टाइम्स'च्या वृत्तानुसार, युक्रेनमधील काही वाटाघाटीकर्त्यांनी या युद्धात अडकलेल्या डोनबास भागातील एक तुकडा ट्रम्प यांच्या नावे करून त्यांना रशियाच्या विरोधात ठाम भूमिका घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रस्तावित भाग ग्रेटर लंडनच्या तुलनेत तीन ते चार पटीने मोठा आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या कथित 'डोनीलँड'साठी चक्क 'चॅटजीपीटी'चा वापर करून एक राष्ट्रगीत आणि हिरव्या-सोनेरी रंगाचा ध्वजही तयार करण्यात आला आहे.
रशियाच्या दाव्याला शह देण्याचा प्रयत्न?
डोनबास हा भाग रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांसाठी वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. हा परिसर साधारण ८० बाय ६५ किलोमीटर इतका मोठा असून, सध्या तो युक्रेनच्या नियंत्रणात आहे. रशिया या भागावर आपला पूर्ण कायदेशीर अधिकार सांगत आहे, तर कीव आपली जमीन सोडण्यास तयार नाही. अशा वेळी, ट्रम्प यांचे नाव या भागाशी जोडून, रशियाच्या भूभागावरील वाढत्या दाव्यांना अमेरिकेच्या माध्यमातून शह देण्याचा हा एक 'राजकीय डाव' असल्याचे मानले जात आहे.
अधिकृत शिक्कामोर्तब नाहीच
जरी या प्रस्तावावरून चर्चा सुरू असली, तरी युक्रेनच्या अधिकृत सूत्रांनी किंवा झेलेन्स्की प्रशासनाने यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. अनौपचारिक चर्चेदरम्यान हे नाव गमतीत किंवा ट्रम्प प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पुढे केले गेले असावे, असेही काही विश्लेषकांचे मत आहे. भविष्यात या भागात 'डीमिलिटराइज्ड झोन' किंवा 'फ्री इकॉनॉमिक झोन' स्थापन करण्याच्या पर्यायांवरही विचार सुरू आहे.