खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 19:31 IST2026-04-22T19:30:49+5:302026-04-22T19:31:12+5:30
भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे...

खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे यांची अडचण वाढली आहे. या प्रकरणाची दखल घेत निवडणूक आयोगाने बुधवारी (२२ एप्रिल २०२६) त्यांना नोटीस बजावली असून, २४ तासांच्या आत स्पष्टीकरण मागवले आहे. खर्गे यांच्या या विधानानंतर, भाजपही आक्रमक झाला आहे.
भाजपच्या तक्रारीनंतर आयोगाची कारवाई -
भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू आणि कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. काँग्रेस अध्यक्षांच्या वादग्रस्त विधानावर कडक कारवाई करण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली होती. यानंतर आयोगाने हे पाऊल उचलले.
काय म्हणाले होते मल्लीकार्जुन खर्गे? -
मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी चेन्नई येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना एआयएडीएमकेवर (AIADMK) टीका करतानाच आपला मोर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वळवला आणि पंतप्रधान मोदींचा उल्लेख 'दहशतवादी' असा केला होता. त्यांच्या या विधानानंर, मोठा वाद निर्माण झाला.
भाजपने या विधानाचा तीव्र निषेध केला असून, हा केवळ पंतप्रधान मोदींचाच नाही तर देशातील १४२ कोटी भारतीयांचा अपमान असल्याचे भाजपने म्हटले आहे. खर्गे यांनी आपल्या विधानावर नंतर स्पष्टीकरण दिले असले तरी, यावरून पेटलेले राजकीय युद्ध अद्याप थांबताना दिसत नाही. आता खर्गे निवडणूक आयोगाला काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.