मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 19:57 IST2026-04-22T19:55:41+5:302026-04-22T19:57:00+5:30
२००६ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय. पुराव्यांच्या अभावामुळे ४ आरोपींवरील दोषारोप रद्द

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
२००६ मधील बहुचर्चित आणि संवेदनशील असलेल्या मालेगाव साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. पुराव्यांच्या अभावामुळे या चौघांविरुद्धचे दोषारोप न्यायालयाने रद्द केले असून, त्यांना या प्रकरणातून मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे संबंधित आरोपींवरील खटल्याची प्रक्रिया आता संपुष्टात आली आहे.
काय आहे प्रकरण?
८ सप्टेंबर २००६ रोजी मालेगावमध्ये शब-ए-बारातच्या दिवशी मशिदीजवळ भीषण साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या दुर्दैवी घटनेत ३७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो लोक गंभीर जखमी झाले होते. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास एटीएसकडून करण्यात आला होता आणि त्यात ९ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयनेही या तपासाला दुजोरा दिला होता. मात्र, नंतरच्या काळात एनआयएकडे हे प्रकरण सोपवण्यात आले होते.
कोणाची झाली मुक्तता?
उच्च न्यायालयाने ज्या चार आरोपींवरील दोषारोप रद्द केले आहेत, त्यात लोकेश शर्मा, धन सिंह, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नरवारिया यांचा समावेश आहे. याआधीही याच प्रकरणातील ११ जणांना पुराव्याअभावी न्यायालयाने दोषमुक्त केले होते. आता या चौघांविरुद्धचे आरोपपत्रही न्यायालयाने रद्द केल्याने त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुढे काय?
न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता तपास यंत्रणांसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणातील अन्य आरोपी नूरुल हुदा याने या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले असून, आता एनआयए या निर्णयाविरुद्ध पुन्हा दाद मागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अद्याप तपास यंत्रणेकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. २००६ च्या या बॉम्बस्फोटातील पीडितांसाठी आणि न्यायव्यवस्थेसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा कायदेशीर टप्पा मानला जात आहे.