उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 20:30 IST2026-04-22T20:30:05+5:302026-04-22T20:30:39+5:30

महापौरांना अडवल्याने सुरक्षा रक्षकांशी झटापट

Ulhasnagar Municipal Corporation clashes over 'dumping'; BJP corporators stage sit-in protest | उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

उल्हासनगर : महापालिका महासभेत भाजप नगरसेवकांनी डम्पिंग ग्राऊंड हटाव प्रकरणी आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन केले. डम्पिंगला लागणाऱ्या आगीच्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी करून महापालिका प्रवेशद्वारा जवळ महापौर अश्विनी निकम यांचा रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप नगरसेवक व सुरक्षा रक्षक यांच्यात शाब्दिक चकमक व झटापट झाल्याने, तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

उल्हासनगर महापालिका महासभा सुरू होण्यापूर्वी भाजप नगरसेविका रत्नमाला दुर्गे, ललिता पाटील, विपुल मयेकर, प्रधान पाटील, राजू गोपलानी व अन्य नगरसेवकांनी हातात बॅनर्स घेऊन, महापालिका प्रवेशद्वार बाहेर घोषणाबाजी केली. यावेळी महापौर अश्विनी निकम महापालिकेत प्रवेश करत असताना त्यांना प्रवेशद्वारावरच अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी नगरसेवकांना रोखल्याने दोन्ही बाजूंमध्ये मोठी झटापट झाली. अखेर घोषणाबाजी करतच नगरसेवकांनी मुख्यालयात प्रवेश केला. त्यानंतर महासभेत भाजप नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केले. 

महापालिका महासभा सुरू होताच भाजपच्या नगरसेवकांनी महासभेत थेट महापौर व आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला. शहरातील डम्पिंग कधी हटवणार? असा जाब त्यांनी प्रशासनाला विचारला. यावेळी भाजपचे गटनेते राजेश वधारिया, राजेश वानखडे, शेरी लुंड आक्रमक झाले होते. तर दुसरीकडे, शिंदेसेनेचे गटनेते अरुण आशान, जमनुदास पुरस्वानी आणि राजेंद्र चौधरी यांनी भाजपची भूमिका चुकीची असल्याचे सांगत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी राजेंद्र चौधरी यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ वातावरणात अधिकच तणाव निर्माण झाला होता. अखेर आयुक्तांच्या आश्वासनानंतर भाजपने आपले आंदोलन मागे घेतले. 

'तुझे माझे जमेना...' सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली

उल्हासनगर महापालिकेत शिंदेसेना आणि भाजप यांची युती सत्तास्थानी आहे. महापौर शिंदेसेनेच्या आहेत, तर उपमहापौर भाजपच्या असूनही गेल्या काही काळापासून दोन्ही पक्षांचे नगरसेवक आमनेसामने येत आहेत. आजच्या आंदोलनानंतर राजकीय वर्तुळात तुझे माझे जमेना आणि तुझ्याविना करमेना अशी महायुतीची अवस्था झाल्याची चर्चा रंगली आहे. 

सामूहिक डम्पिंगबाबत आयुक्तांचे स्पष्टीकरण 

या गदारोळानंतर आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी डम्पिंग संदर्भात प्रशासनाची बाजू मांडली. बदलापूर येथील सामूहिक डम्पिंग ग्राऊंडचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. हे डम्पिंग ग्राऊंड नेमके कधी सुरू होईल, यावर तोडगा काढण्यासाठी लवकरच एमएमआरडीए सोबत विशेष बैठक घेण्यात येईल. तसेच सध्या असलेल्या डम्पिंगवरील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पावले उचलली जात आहेत.

Web Title : उल्हासनगर महानगरपालिका में डंपिंग को लेकर हंगामा; भाजपा का प्रदर्शन।

Web Summary : उल्हासनगर में भाजपा पार्षदों ने डंपिंग ग्राउंड के मुद्दे पर विरोध प्रदर्शन किया और स्वास्थ्य संबंधी खतरों के कारण इसे हटाने की मांग की। सुरक्षाकर्मियों से उनकी झड़प हुई, जिससे कार्यवाही बाधित हुई। शिवसेना गुट के साथ तनाव के बावजूद, आयुक्त के आश्वासन के बाद विरोध प्रदर्शन समाप्त हो गया।

Web Title : Uproar in Ulhasnagar Municipal Corporation over dumping; BJP protest.

Web Summary : BJP corporators protested Ulhasnagar's dumping ground issue, demanding its removal due to health hazards. They clashed with security, disrupting proceedings. Despite tensions with the Shiv Sena faction, assurances from the commissioner led to the protest's end.