अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 16:39 IST2026-04-22T16:39:21+5:302026-04-22T16:39:45+5:30
US seizes Iranian tanker Bay of Bengal: भारताच्या शेजारी अमेरिकेचा मोठा सर्जिकल स्ट्राईक! बंगालच्या खाडीत इराणी तेलाचा टँकर जप्त; इराण-अमेरिका युद्ध भडकणार?

अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
अमेरिकेने इराणच्या विरोधात सुरू केलेली नाकेबंदी आता केवळ आखाती देशांपुरती मर्यादित राहिलेली नाही. २१ एप्रिल २०२६ रोजी अमेरिकन सैन्याने बंगालच्या खाडीत, म्हणजेच श्रीलंका आणि इंडोनेशिया यांच्या दरम्यान असलेल्या आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात 'टिफनी' नावाचे तेलवाहू जहाज जप्त केले.
जप्त केलेले जहाज बोत्सवानाचा झेंडा लावून फिरत होते, मात्र ते इराणचे 'डार्क फ्लीट' असून प्रतिबंध झुगारून तेलाची तस्करी करत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. या टँकरमध्ये सुमारे २० लाख बॅरल कच्चे तेल असून ते इराणच्या खार्ग आयलंडवरून ५ एप्रिल रोजी भरले गेले होते. या कारवाईसोबतच डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने इराणशी संबंधित जहाजांचा मागोवा घेण्यासाठी 'ग्लोबल वॉर्निंग सिस्टम' लागू केली आहे.
१३ एप्रिलपासून अमेरिकेने सुरू केलेल्या या नाकेबंदीमुळे आतापर्यंत २८ हून अधिक जहाजांना त्यांचा मार्ग बदलावा लागला आहे किंवा माघारी परतावे लागले आहे. भारताच्या जवळ अमेरिकेची ही दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी भारतातून युद्धसराव संपवून इराणला निघालेल्या इराणी युद्धनौकेवर अमेरिकेने श्रीलंकेजवळ हल्ला केला होता. या युद्धनौकेवर कोणतीही शस्त्रास्त्रे लोड केलेली नव्हती. तरीही अमेरिकेने ही कारवाई केली होती. यानंतर अमेरिकेने ही दुसरी कारवाई केली आहे.
दुसरीकडे इराणने देखील होर्मुझमध्ये जहाजांवर कारवाई सुरु केली असून आज दुसऱ्यांदा भारतीय जहाजांवर गोळीबार केला आहे. तसेच एक जहाज ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी थांबलेले मिसाईल आणि ड्रोनचे युद्ध आता समुद्रात वेगळ्या रुपात सुरु झाले आहे.