Ashok Kharat : अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 14:05 IST2026-04-22T14:03:23+5:302026-04-22T14:05:32+5:30
Ashok Kharat : भोंदू अशोक खरात याने उरणमध्येही जमीन खरेदी केली असल्याचे उघडकीस आले आहे.

Ashok Kharat : अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय
भोंदू अशोक खरात याने उरणमध्येही जमीन खरेदी केली असल्याचे उघडकीस आले आहे. शासकीय दराने खरेदीखत करून दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात जमीन खरेदी-विक्रीत अडीच ते तीन कोटींचा व्यवहार झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या २० गुंठे जमिनीची केवळ ५८ लाख ५० हजार रुपयांमध्ये खरेदी केली आहे.
कल्पना खरातच्या नावावर उरण चाणजे महसूल हद्दीतील सर्व्हे नं. ३७१/३८ मध्ये २० गुंठे जमीन ५८ लाख ५० हजार रुपयांमध्ये खरेदी केली आहे. त्याची नोंदणी १२ मार्च २०२६ रोजी येथील दुय्यम निबंधक सहकारी कार्यालयात झाली आहे. त्यानंतर १३ एप्रिल २०२६ रोजी फेरफार मंजुरी आणि कल्पना खरातच्या नावाने सातबारा उतारा तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती.
भोंदू खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर, भक्तांची यादी ईडीच्या ताब्यात
पुढील कार्यवाहीसाठी कुणीही पुढे आले नसल्याने नोंदी रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली. चाणजे महसुली हद्दीतील करंजा मच्छीमार बंदर, करंजा-रेवस सागरी सेतू, रो-रो सेवा यामुळे या परिसरातील जागा, जमिनींचे भाव आकाशाला भिडले आहेत. येथील जमिनीचा प्रतिगुंठा १४ ते १५ लाखांपर्यंत खरेदी-विक्री केली जात असल्याची माहिती चाणजे ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच अजय म्हात्रे यांनी दिली.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
खरात विरुद्ध सिन्नरमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल
सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील श्री जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत भोंदू अशोक खरात याने ३२ खाती उघडल्याचे प्रकरण समोर आले आहे. यात फिर्यादीच्या खात्यातून ५७ लाख ९० हजार ९७९ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी अशोक एकनाथ खरात याच्यासह पतसंस्थेचे व्यवस्थापक, कर्मचारी व संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
नारायण रामचंद्र घोटेकर (रा. घोटेवाडी, ता. सिन्नर) यांनी फिर्याद दिली. तक्रारीनुसार १० ऑगस्ट २०१६ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत खरात व संबंधितांनी फिर्यादीसह ३२ व्यक्तींची बनावट खाती पतसंस्थेत उघडली.
'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
खाते उघडताना आवश्यक ओळख पडताळणी, आधार व पॅन कार्ड तपासणी तसेच ओळखदारांची माहिती घेण्याची प्रक्रिया न पाळता हे व्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे फिर्यादीची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रूपाली चव्हाण पुढील तपास करीत आहेत.