पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 14:34 IST2026-04-22T14:34:41+5:302026-04-22T14:34:51+5:30
America Iran War: अमेरिका आणि इराण यांच्यात समेट घडवून आणण्यात पाकिस्तानला सातत्याने अपयश येत आहे.

पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
America Iran War: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धातून कोणताही देश माघार घ्यायला तयार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाला मुदतवाढ दिली आहे. तसेच इराणने करार करावा, यासाठी अमेरिकेने आग्रह धरला आहे. अमेरिका आणि इराण संघर्षात पाकिस्तान मध्यस्थी करत आहे. इस्लामाबादमध्ये झालेली पहिली शांतता बैठक निष्फळ ठरली असली तरी आता पुन्हा एकदा शांतता चर्चेसाठी बैठक व्हावी, यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. यातच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या एका विधानामुळे भारत यात मध्यस्थी करणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.
पहिली शांतता चर्चा फिसकटल्यानंतर अमेरिका आणि इराण यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. यानंतर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर टोल घेण्याबाबत आग्रही भूमिका घेतली. यानंतर अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीवर नाकेबंदी केली. जोपर्यंत इराण करार करत नाही, तोपर्यंत ही नाकेबंदी सुरूच राहणार असल्याचे अमेरिकेने ठामपणे सांगितले. शांतता बैठकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमेरिका तयार आहे, परंतु, इराणने अद्याप तशी तयारी दर्शवली नाही. दोन्ही देशात समेट घडावा, यासाठी पाकिस्तानचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पण, त्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. यातच राजनाथ सिंह यांनी याबाबत मोठे विधान केले आहे.
भारत आपली भूमिका बजावून यशस्वी होऊ शकेल
पश्चिम आशियातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या भूमिकेबाबत एक मोठे विधान समोर आले आहे. जर्मनीमध्ये असलेले भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भारत सध्याच्या परिस्थितीत थेट मध्यस्थी करत नसला, तरी भविष्यात तशी शक्यता नाकारता येत नाही. भारताने आपल्या बाजूने प्रयत्न केले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही बाजूंना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. तुम्हाला माहिती आहे की, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. कदाचित भविष्यात अशी वेळ येईल, जेव्हा भारत आपली भूमिका बजावेल आणि यशस्वीही होऊ शकेल, असे सूचक विधान राजनाथ सिंह यांनी केले आहे. राजनैतिक बाबींबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन नेहमीच संतुलन आणि संवादावर आधारित राहिला आहे. भारताने सातत्याने युद्धाचा अंत आणि शांतता प्रस्थापित व्हावी, यावर भर दिला आहे, असेही राजनाथ सिंह यांनी नमूद केले.
दरम्यान, राजनाथ सिंह यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात संवाद घडवून आणण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. एखादा तिसरा देश हस्तक्षेप करून ही परिस्थिती हाताळू शकतो का, याकडे जगाचे लक्ष लागले असल्याचे म्हटले जात आहे.