३००० रुपयांसाठी 'त्या' दोघांनी दिला २६ जणांचा बळी; एका फोनमुळे पहलगाममध्ये वाचला असता सर्वांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 16:10 IST2026-04-23T15:52:11+5:302026-04-23T16:10:56+5:30

पहलगाम हल्ल्याला वर्ष पूर्ण होत असतानाच आता त्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

२२ एप्रिल २०२५... पहलगामच्या निसर्गरम्य दरीत रक्ताचा सडा पडला होता. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची निर्घृण हत्या केली होती.

पहलगाम हल्ल्याच्या घटनेला वर्ष पूर्ण होत असतानाच, तपासातून एक धक्कादायक खुलासा झाला आहे. जर दोन स्थानिक काश्मिरी नागरिकांनी केवळ एका फोन करण्याचा मोठेपणा दाखवला असता, तर हा भीषण नरसंहार रोखता आला असता.

परवेज अहमद आणि बशीर अहमद जोथड या दोन स्थानिकांनी हल्ल्याच्या आदल्या रात्री तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना आपल्या घरात आश्रय दिला होता. धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या ३००० रुपयांच्या लालसेपोटी त्यांनी या दहशतवाद्यांना फक्त लपवून ठेवले नाही, तर त्यांना पोटभर जेवणही दिले.

तपासानुसार, फैसल जट्ट, हबीब ताहिर आणि हमजा अफगानी हे तीनही दहशतवादी उर्दू-पंजाबी मिश्रित पाकिस्तानी लहेजात बोलत होते. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे होती.

गप्पांच्या ओघात ते वारंवार अली भाई नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत होते. हा 'अली भाई' म्हणजेच लष्कर-ए-तोयबा आणि टीआरएफचा टॉप कमांडर साजिद जट्ट असून तो या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे.

साजिद जट्टचा उल्लेख ऐकल्यानंतर या दोन्ही आरोपींना हे लोक दहशतवादी असून काहीतरी मोठा घातपात करणार आहेत, याची पूर्ण कल्पना आली होती. मात्र, तरीही त्यांनी मौन बाळगणे पसंत केले.

२१ एप्रिलच्या रात्री १०.३० वाजता दहशतवादी काही भांडी, ब्लँकेट आणि खाण्याचे सामान घेऊन घरून निघाले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ एप्रिलला दुपारी १२.३० च्या सुमारास बशीर आणि परवेजने या दहशतवाद्यांना बैसरन व्हॅलीच्या कुंपणामागे लपलेले पाहिले होते. तरीही त्यांनी स्थानिक पोलिसांना किंवा इतरांना याची माहिती दिली नाही.

बशीर आणि परवेज हे त्यांच्यासोबत आलेल्या पर्यटकांची वाट पाहत तिथेच थांबले. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार करत २६ जणांची हत्या केली.

हल्ल्यानंतर हे दोघेही आपल्या डोंगरावरील झोपड्या सोडून पळून गेले. मात्र, २२ जून २०२५ रोजी एनआयएने त्यांना अटक केली. डिसेंबर २०२५ मध्ये दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात एनआयएने साजिद जट्ट, तीन पाकिस्तानी दहशतवादी, परवेज आणि बशीर अहमद यांची नावे टाकली आहेत.