जमिनीवर धावणार अन् पाण्यातही पोहणार! भारताचा नवा 'विक्रम'; ३० मिमी तोप अन् १ हजार मीटरवर मारा करणारी गन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 17:44 IST2026-04-29T17:33:35+5:302026-04-29T17:44:33+5:30

Indian Army Vikram VT-21: भारतीय लष्कराच्या ताकदीत आता आणखी एक 'ब्रह्मास्त्र' सामील झाले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने स्वदेशी बनावटीचे 'विक्रम VT-21' हे इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकल विकसित केले आहे.

अत्यंत दुर्गम डोंगराळ भाग असो वा वाळवंटातील रणरणते ऊन, हे वाहन शत्रूला शह देण्यासाठी सज्ज झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, हे वाहन भारतीय सैन्यातील जुन्या 'सारथ BMP-२' ची जागा घेणार आहे.

डीआरडीओ अंतर्गत असलेल्या व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने भारत फोर्ज आणि टाटा ॲडवान्स्ड सिस्टिम्स या दोन दिग्गज कंपन्यांच्या मदतीने केवळ ३ वर्षांच्या विक्रमी वेळेत हा प्रकल्प पूर्ण केला आहे.

विक्रम VT-21 दोन प्रकारात उपलब्ध असेल. ज्यातील व्हील्ड हे टायर्सवर चालणारे वाहन असून रस्त्यांवर आणि शहरी भागात वेगाने हालचाल करण्यासाठी उत्तम आहे. तर ट्रॅक्ड हे टँकप्रमाणे चेनवर चालते. ओबड-धोबड रस्ते, चिखल आणि अत्यंत दुर्गम भागात हे वाहन अधिक प्रभावी ठरते.

विक्रमची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे वाहन जमिनीसोबतच पाण्यातही चालू शकते. यात हायड्रो जेट आणि वॉटर प्रोपल्शन सिस्टिम देण्यात आली आहे, ज्यामुळे नद्या पार करणे सैन्याला सोपे जाईल.

या वाहनाच्या वर ३६० अंश फिरणारा एक प्लॅटफॉर्म आहे. महत्त्वाचे म्हणजे, हे शस्त्र चालवण्यासाठी सैनिकाला बाहेर येण्याची गरज नाही. तो आत बसूनच रिमोटद्वारे हल्ला करू शकतो.

यावर लांब पल्ल्यावरील लक्ष्यावर मारा करणारी ३० मिमी मुख्य तोप, १ हजार मीटरपर्यंत अचूक टप्पा गाठणारी ७.६२ मिमी PKT मशीन गन अशी घातक शस्त्रास्त्रे आहे. तर नाग हे अँटी-टँक गाईडेड मिसाइल देखील बसवण्यात आले आहे.

विक्रममध्ये नाटो मानकांनुसार STANAG ४ आणि ५ ची सुरक्षा देण्यात आली आहे. याचा अर्थ, शक्तिशाली बॉम्बस्फोट किंवा जड शस्त्रांच्या हल्ल्यातही वाहनातील सैनिक पूर्णपणे सुरक्षित राहतील. याला ७२० हॉर्स पॉवर क्षमतेचे ऑटोमॅटिक डिझेल इंजिन देण्यात आले असून, ते कोणत्याही हवामानात वेगवान कामगिरी करण्यास सक्षम आहे.