गारेगार हवा देणाऱ्या AC चा शोध लागला तरी कसा, पहिल्या एसीचा उद्देश वाचाल तर बसणार नाही विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 12:42 IST2026-05-01T12:20:55+5:302026-05-01T12:42:07+5:30
Air Conditioner History : आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, एसीचा आविष्कार गरमीपासून बचावासाठी केलाच गेला नव्हता. त्याचा उद्देश काहीतरी वेगळाच होता. तो काय पाहुयात.

Air Conditioner History : सध्या उकाडा इतका वाढलाय की, एसीशिवाय राहणं म्हणजे जीव कासावीस होऊ लागतो. एसीतून बाहेर पडलं तर नुसत्या घामाच्या धारा लागतात. घरात असो की कारमध्ये सगळीकडे एअर कंडीशनर लागतोच लागतो. एसीचा गार वारा घर गार करतो आणि आपल्यालाही गार करतो. पण आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, एसीचा आविष्कार गरमीपासून बचावासाठी केलाच गेला नव्हता. त्याचा उद्देश काहीतरी वेगळाच होता. तो काय पाहुयात.

आधुनिक एअर कंडीशनरचा आविष्कार १९०२ मध्ये ब्रुकलिनमधील एका प्रिंटिंग कंपनीत ओलावा कंट्रोल करण्यासाठी केला गेला होता. झालं असं होतं की, एका प्रिटिंग कंपनीत हवेत जास्त आर्द्रता होती, कागद फुगत होता, शाई नीट बसत नव्हती आणि छपाईची गुणवत्ता खराब होत होती. मग यावर विलिस हेवीलँड कॅरियरने उपाय शोधला.

कॅरियरला आढळलं की, एसीच्या थंड कॉइलवरून हवा गेल्यानंतर त्यातून आलोवा निघून जातो. या प्रक्रियेने ओलावा कमी झाला आणि सोबतच हवाही थंड झाली. हाच सिद्धांत आजही आधुनिक एअर कंडीशनर सिस्टीममध्ये वापरला जातो.

सुरूवातीला एअर कंडीशनरचा वापर फॅक्टरीमध्ये क्वालिटी कायम ठेवण्यासाठी केला जात होता. लोकांना आराम देण्याची वस्तू बनण्यासाठी एसीला बरेच वर्ष लागलेत.

१९२० दरम्यान न्यूयॉर्क शहराच्या सिनेमागृहांमध्ये एअर कंडीशनर लावले गेले. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लोक केवळ एसीच्या थंड हवेचा आनंद घेण्यासाठी सिनेमा बघायला गर्दी करत होते. त्यामुळे एअर कंडीशनर घराची गरज बनण्याच्या आधीच लोकांमध्ये आकर्षणाचं केंद्र बनला होता.

आधुनिक एअर कंडीशनर येण्याआधी लोक गरमीपासून आराम मिळवण्यासाठी वेगवेगळे उपाय करत होते. हॉस्पिटल थंड ठेवण्यासाठी बर्फ बनवण्याच्या मशीनचा वापर केला जात होता. तसेच रोमसारख्या प्राचीन संस्कृतीमध्ये तापमान कमी करण्यासाठी पाणी आणि ओल्या चटईंचा वापर केला जात होता.

















