Adani Group Gautam Adani News: देशातील वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, गौतम अदानी यांचा ग्रुप आता स्वतःला अधिक मजबूत आणि वेगवान बनवण्याच्या तयारीत आहे. जलद निर्णय घेणं आणि कामकाजात सुधारणा करण्यासाठी कंपनी आपल्या संपूर्ण ऑपरेटिंग स्ट्रक्चरमध्ये मोठा बदल करत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आणि एनर्जी सेक्टरमध्ये वाढत्या गुंतवणुकीमुळे कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र झाली आहे, अशा परिस्थितीत हे पाऊल महत्त्वाचं मानलं जातंय.
कामगार दिनानिमित्त कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या अंतर्गत मेमोमध्ये गौतम अदानी यांनी सांगितलं की, समूह आता एक सोपी आणि कमी स्तरांची 'थ्री-टियर्ड ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर' म्हणजेच त्रिसदस्यीय संघटनात्मक रचना स्वीकारणार आहे. या नवीन मॉडेलमध्ये निर्णय घेणाऱ्यांची संख्या कमी असेल. "त्रिसदस्यीय रचनेचा उद्देश संघटनेला सोपं बनवणं आहे, जेणेकरून जबाबदाऱ्या स्पष्ट असतील आणि निर्णय जलद घेतले जाऊ शकतील," असं अदानी म्हणाले.
२०१५ नंतरचा दुसरा मोठा बदल
अदानी ग्रुपचा २०१५ नंतरचा हा दुसरा मोठा संघटनात्मक बदल आहे. त्यावेळी कंपनीनं आपले पोर्ट्स आणि पॉवर बिझनेस वेगळे करून शेअर बाजारात लिस्ट केले होते. त्यामुळे कंपनीची रचना पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट आणि सोपी झाली होती. यामुळे गुंतवणूकदारांना थेट वेगवेगळ्या व्यवसायात गुंतवणूक करण्याची संधी मिळाली, ज्यामुळे त्यांचे मूल्यही वाढलं.
वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा परिणाम
हा नवीन बदल अशा वेळी होत आहे जेव्हा भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, लॉजिस्टिक्स, एनर्जी आणि कन्झ्युमर सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. अशा वातावरणात कंपन्यांमधील स्पर्धाही वाढली आहे, त्यामुळे मोठे समूह आता वेगाने निर्णय घेण्याचा आणि आपल्या कामकाजावर अधिक नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
कामगारांसाठी मोठ्या स्तरावर तयारी
केवळ व्यवसायच नाही, तर अदानी ग्रुप आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सुविधाही वाढवत आहे. कंपनीनं सांगितलं की, ते त्यांच्या मोठ्या प्रकल्पांजवळ ५०,००० कामगारांच्या राहण्याची सोय करत आहेत. याशिवाय, गुजरातच्या मुंद्रा येथे १७५ एकरमध्ये पसरलेल्या एका मोठ्या टाउनशिप प्रकल्पावर सुमारे ५० अब्ज रुपये (सुमारे ५२७ मिलियन डॉलर) गुंतवणूक केली जात आहे. यामुळे काम करणाऱ्या लोकांना चांगल्या सुविधा मिळतील आणि प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यास मदत होईल.
