मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात कच्च्या तेलाचं संकट उभं राहिलं आहे. परंतु यादरम्यान भारतानं केलेली कामगिरी मात्र कौतुकास्पद असल्याचं अनेक स्तरातून म्हटलं जातंय. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर परिणाम होत असताना आणि किमती वाढत असताना पाकिस्ताननं केलेले दावे आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. ही बाब अमेरिकन उद्योजक आणि रिच डॅट पूअर डॅडचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्या फेसबुक पोस्टमुळे अधिक स्पष्ट होताना दिसतेय. "एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," असं म्हणत कियोसाकी यांनी एक पोस्ट शेअर केलीये.
रॉबर्ट कियोसाकी यांनी पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेज मलिक यांच्या वक्तव्यांकडे लक्ष वेधलं. पाकिस्तानकडे एक दिवसापुरताही स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम साठा उपलब्ध नाही, नसल्याचं मलिक यांनी म्हटलं होतं. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानची इंधन पुरवठा व्यवस्था "सुरक्षित आणि स्थिर" असल्याचा दावा केला होता. त्यांनी भारतासह इतर देशांपेक्षा पाकिस्तानची स्थिती चांगली असल्याचं सांगत, भारतात पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा आणि तुटवडा असल्याचा खोडसाळ दावा त्यांनी केला होता.
रॉबर्ट कियोसाकी यांनी दाखवला आरसा
इराण संघर्षानं 'होर्मुझच्या सामुद्रधुनी'त निर्माण झालेल्या अडथळ्यानंतर, पाकिस्तानमध्ये इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. एप्रिल २०२६ च्या सुरुवातीला, पेट्रोलची किंमत सुमारे ३२१ पाकिस्तानी रुपयांवरून ४५८ पाकिस्तानी रुपये प्रति लिटर झाली, जी एका महिन्यात ४३ टक्क्यांची प्रचंड वाढ होती. डिझेलच्या किमतीत तर ५५ टक्क्यांची वाढ होऊन ते ३३५ पाकिस्तानी रुपयांवरून ५२० पाकिस्तानी रुपयांवर पोहोचलं. यामुळे संपूर्ण देशात जोरदार निदर्शनं सुरू झाली आणि व्यावसायिक पुरवठा साखळी पूर्णपणे ठप्प होण्याची भीती निर्माण झाली.
भारताची स्थिर स्थिती
दुसरीकडे, सीमेपलिकेडे चित्र अगदी वेगळं होतं. जागतिक स्तरावर तेलाचं तेच संकट असूनही आणि कच्च्या तेलाच्या किमती १२० डॉलर प्रति बॅरलच्या वर पोहोचल्या असूनही, भारतातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर राहिल्या.
रॉबर्ट कियोसाकी यांच्या मते, भारतानं करोनाची महासाथ, रशिया-युक्रेन युद्ध आणि आताचा इराण संघर्ष या सर्व संकटांचा सामना किमतींमध्ये मोठी वाढ न होऊ देता यशस्वीपणे केला. त्यांनी असा तर्क दिला की भारताने धोरणात्मक पेट्रोलियम साठा तयार केला आहे, जो व्यावसायिक साठ्यासह मिळून ६०-७० दिवसांसाठी पुरेसा आहे. भारतानं रशियाला मुख्य स्रोत म्हणून वापरत आपल्या पुरवठा साखळीचा विस्तार केला आणि २०२६ मध्ये ते व्हेनेझुएलातूनही शिपमेंट परत आणत आहेत. जगातील सर्वात मोठ्या रिफायनिंग हबपैकी एक असल्यानं भारतानं हा जागतिक धक्का पचवला.
पाकिस्तानच्या धोरणांमधील त्रुटी
जेव्हा मंत्री मलिक म्हणाले की "आम्ही भारत नाही," यावर कियोसाकी यांनी ते बरोबर असल्याचं म्हटलं. पाकिस्तान जवळजवळ कोणतंही देशांतर्गत तेल उत्पादन करत नाही आणि पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे. त्यांच्याकडे परकीय चलन साठा मर्यादित आहे आणि ते आयएमएफच्या कडक अटींखाली काम करतात.
दरम्यान, पाकिस्तान सरकारनं २२ एप्रिल रोजी धोरणात्मक साठा तयार करण्याच्या शक्यतेवर एक टास्क फोर्स स्थापन केली आहे. कियोसाकी यांच्या पोस्टने हे स्पष्ट केलंय एकाच मंत्र्यानं एका आठवड्यात दोन परस्परविरोधी गोष्टी सांगितल्या. आकडेवारी हेच दर्शवते की पाकिस्तानात इंधन ५० टक्क्यांहून अधिक महागलं, तर भारतानं आपल्या किमती स्थिर ठेवल्या. या युद्धानं हा फरक निर्माण केला नाही, तर तो केवळ जगासमोर आणला.
