एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 14:56 IST2026-05-01T14:54:43+5:302026-05-01T14:56:46+5:30
Uttar Pradesh Crime News: नात्यांमधील विश्वासाला कलंकित करणारी एक घटना उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे घडली आहे. येथे पत्नी आणि सासऱ्याने मिळून जावयाची हत्या केल्याची घटना अनेक महिन्यांनंतर उघडकीस आली आहे.

एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग
नात्यांमधील विश्वासाला कलंकित करणारी एक घटना उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे घडली आहे. येथे पत्नी आणि सासऱ्याने मिळून जावयाची हत्या केल्याची घटना अनेक महिन्यांनंतर उघडकीस आली आहे. एका व्यक्तीच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाच्या व्हिसेराचा अहवाल आल्यानंतर पत्नी आणि सासऱ्याने केलेल्या या कुकृत्याचं बिंग फुटलं.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ट्रान्स यमुना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गंभीर गुन्हा घडला आहे. मृत जितेंद्र याला २२ नोव्हेंबर २०२५ रोजी त्याच्या सासरी वाढदिवसाच्या पार्टीच्या निमित्ताने बोलावण्यात आले होते. तेथील आनंदी वातावरणामध्येच त्याच्या मृत्यूची पटकथा लिहिली जात होती. पार्टीदरम्यान, जितेंद्र याला भरपूर दारू पाजण्यात आली. दरम्यान, रात्री उशिरा प्रकृती बिघडल्याने ३ वाजण्याच्या सुमारास त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यावर सुरुवातीला मृत्यूचं कारण स्पष्ट झालं नाही. अशा परिस्थितीत पोलिसांनी व्हिसेरा सुरक्षित ठेवून तपासणीसाठी पाठवला. अखेरीस चार महिन्यांनंतर या व्हिसेराचा एफएसएल रिपोर्ट आला. तसेच त्यामधून धक्कादायक माहिती समोर आली. जितेंद्रचा मृत्यू सल्फास नावाच्या विषामुळे झाला होता, असे या अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे संशयास्पत वाटत असलेला मृत्यू हत्येच्या गुन्ह्यात बदलला.
त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केल्यावर यामागे जितेंद्रची पत्नी तनू आणि जितेंद्रचे सासरे महेंद्र यांचा हात असल्याचे निष्पन्न झाले. जितेंद्र आणि तनू यांच्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. त्यावादातून तनू आणि तिच्या वडिलांनी मिळून जितेंद्रची व्यवस्थित नियोजनबद्धरीत्या हत्या केली. आता या दोघांनाही अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. तसेच पोलीस अधिक तपास करत आहेत.