मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 14:42 IST2026-05-01T14:41:38+5:302026-05-01T14:42:01+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त करत वाहतूक कोंडीत अडकलेल्यांची माफी मागितली आहे

मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
CM Devendra Fadnavis on Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई-पुणे मिसिंग लिंकचं लोकार्पण करण्यात आलं. मात्र कार्यक्रमामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अनेक वाहने सहा तास या कोंडीत अडकली होती. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनाही या कोंडीचा सामना करावा लागला. त्यांनी व्हिडीओद्वारे मिसिंग लिंकच्या उद्घाटनाआधीच खंडाळा घाटात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं दाखवलं. मिसिंग लिंकच्या लोकापर्णानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त करत वाहतूक कोंडीत अडकलेल्यांची माफी मागितली आहे. तसेच सुप्रिया सुळे यांनाही खास सल्ला दिला आहे.
"मला अतिशय आनंद आहे की आम्ही काम पूर्ण केले आहे. जवळपास ७१८१ कोटी रुपये या प्रकल्पासाठी लागले आहेत आणि आपण एक चमत्कार तयार करु शकलो आहोत. मला मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे. त्यांना आज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. बरेच लोक कोंडीत अडकले होते. सुप्रिया सुळे देखील अडकल्या होत्या. त्यांनी काढलेल्या व्हिडीओमधून त्यांचा संदेश आमच्यापर्यंत पोहोचला. त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही शेवटच्या वेळी वाहतूक कोंडीत अडकल्या आहात. आता कनेक्टिंग लिंक झाली आहे. त्यामुळे पुढच्यावेळी मुंबईहून पुण्याला आणि पुण्याहून मुंबईला जाताना कोंडीत अडकण्याची वेळ येणार नाही. जे काम तुमच्या सरकारने बंद केले होते ते आमच्या महायुतीच्या सरकारने पूर्ण करुन दाखवलं आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीचा वेळ वाचवण्यासाठी बांधण्यात आलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाचं आज लोकार्पण करण्यात आलं. मात्र त्याआधीच मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. महाराष्ट्र दिनाला लागून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळं बाहेर निघालेले प्रवासी या वाहतूक कोंडीत अडकून पडले. कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. उन्हामुळे काही गाड्यादेखील बंद पडल्या. या वाहतूक कोंडीत खासदार सुप्रिया सुळेदेखील अडकून पडल्या होत्या.