इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 15:42 IST2026-04-21T15:33:00+5:302026-04-21T15:42:17+5:30

Shamim Mafi Arrest: इराणची लेडी डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शमीम माफी हिला अमेरिकेतील एका विमानतळावर अटक करण्यात आली.

इराण-अमेरिका संघर्ष सुरु असताना अमेरिकेत एक घटना घडली. अमेरिकेच्या लॉज एंजिल्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर शमीम माफी या महिलेला अटक करण्यात आली. ४४ वर्षाच्या शमीम माफीला अटक करण्याचे कारण वाचून तुम्ही तुम्हालाही धक्का बसेल. कारण या महिलेवर अवैध शस्त्रास्त्र खरेदी विक्री डील करण्याचा आरोप आहे.

इराण सरकारसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर घातक शस्त्रास्त्रांची डील करून देत असल्याचा आरोप तिच्यावर आहे. माफीने आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धात लागणाऱ्या शस्त्रास्त्रांची खरेदी-विक्री नेटवर्क उभे केलेले आहे. त्यामुळेच तिच्या अटकेने शस्त्रास्त्र तस्करीचे जग हादरले आहे.

अमेरिकेच्या अटॉर्नी ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार, शमीम माफी कॅलिफोर्नियाच्या वुडलँड हिल्समधील रहिवाशी आहे. २०१६ मध्ये ती अमेरिकेची नागरिक बनली. इराणमध्ये तयार केले जाणारे ड्रोन्स, बॉम्ब, बॉम्ब फ्यूज आणि स्फोटके आणि स्फोटके तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची डील केल्याचा आरोप तिच्यावर आहे.

इराणमध्ये तयारी होणारी शस्त्रास्त्रे सुदानसारख्या संघर्षग्रस्त देशांमध्ये पाठवली जात होती. शमीम माफी हिच्यावर आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अटॉर्नी बिल असेली यांनी अटक केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

इराण आणि सुदान यांच्या झालेल्या शस्त्र खरेदी व्यवहारात शमीम माफीची महत्त्वाची भूमिका होती. ही फक्त दलाली केलेली नव्हती, तर एका मोहिमेचा भाग होता. शमीम माफीने कोट्यवधी डॉलरचे व्यवहार पूर्ण करून दिले. मागील बऱ्याच वर्षांपासून हे सुरू असून, २०२५ मध्ये बद्दलची गोपनीय माहिती मिळाली होती.