भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 16:38 IST2026-04-21T16:37:54+5:302026-04-21T16:38:36+5:30
रुग्णालयात अचानक रुग्णांची गर्दी वाढल्यामुळे एका सुरक्षा रक्षकालाच 'डॉक्टर'ची भूमिका बजावावी लागली.

फोटो - hindi.news18
बिहारच्या पश्चिम चंपारणमधील बगहा उपजिल्हा रुग्णालयातून आरोग्य व्यवस्थेचं विदारक वास्तव मांडणारं एक धक्कादायक चित्र समोर आलं आहे. रुग्णालयात अचानक रुग्णांची गर्दी वाढल्यामुळे एका सुरक्षा रक्षकालाच 'डॉक्टर'ची भूमिका बजावावी लागली. अपघातात जखमी झालेल्या एका तरुणाला हा सुरक्षा रक्षक टाके घालत असल्याचा व्हिडीओ समोर आला असून यामध्ये डॉक्टरच्या उपस्थितीतच हा गार्ड उपचार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग-७२७ वरील शास्त्री नगरजवळ टेम्पो आणि पिकअप व्हॅनची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात पिकअप चालक वसीम अख्तर आणि सुरेंद्र पासी हे दोघे जखमी झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने बगहा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच वेळी रुग्णालयात इतरही काही अपघातातील रुग्ण आले होते, ज्यामुळे तिथे प्रचंड गोंधळ आणि अफरातफरीची स्थिती निर्माण झाली.
रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा
रुग्णालयात ना पुरेसे डॉक्टर उपलब्ध होते, ना ड्रेसर किंवा ऑपरेशन थिएटर स्टाफ. नर्सची संख्याही अपुरी असल्याचं सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत, डॉक्टरांच्या देखरेखीखाली एका सुरक्षा रक्षकाला जखमींवर प्रथमोपचार करण्यास सांगण्यात आलं. व्हायरल व्हिडिओमध्ये हा गार्ड टाके घालताना स्पष्ट दिसत आहे, जे काम प्रामुख्याने प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं असतं.
जास्त गंभीर रुग्ण आल्याने परिस्थिती हाताळणं कठीण
या प्रकरणावर रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ. अशोक कुमार तिवारी यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की, हे पाऊल केवळ नाईलाजामुळे उचलण्यात आलं. डॉ. अशोक म्हणाले की, "रुग्णालयात दीर्घकाळापासून कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तिथे ड्रेसरची नियुक्ती नाही आणि पुरेशा नर्स किंवा डॉक्टरही उपलब्ध नाहीत. एकाच वेळी पाचपेक्षा जास्त गंभीर रुग्ण आल्याने परिस्थिती हाताळणं कठीण झालं होतं, म्हणूनच गार्डची मदत घ्यावी लागली."