जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 15:50 IST2026-04-21T15:49:30+5:302026-04-21T15:50:38+5:30

Strait of Malacca : मलक्काच्या सामुद्रधुनीत अमेरिकेच्या वाढत्या सक्रियतेमुळे चीनची चिंता वाढली आहे.

The world's 'lifeline' in danger? America's guard on the Strait of Malacca, China's concern increased! | जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!

जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!

जागतिक व्यापाराचा कणा असलेल्या आणि आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थेची 'लाईफलाईन' मानल्या जाणाऱ्या 'मलक्काच्या समुद्रधुनी'त सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच अमेरिकेच्या सातव्या आरमाराचे 'यूएसएस मिगुएल कीथ' हे अद्ययावत जहाज या भागातून गेल्याने चीनची चिंता वाढली आहे. हे केवळ एक जहाज नसून समुद्रातील एक फिरते कमांड सेंटर आहे, ज्यामुळे या मार्गावर आता अमेरिकेचे बारकाईने लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काय आहे मलक्काचा महामार्ग?

इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर यांच्या दरम्यान असलेला हा समुद्री मार्ग हिंद महासागर आणि प्रशांत महासागराला जोडणारा सर्वात छोटा आणि महत्त्वाचा दुवा आहे. जगाच्या एकूण सागरी व्यापारापैकी २५ ते ४० टक्के मालवाहतूक याच अरुंद पट्ट्यातून होते. दरवर्षी ८० हजारांहून अधिक व्यापारी जहाजे येथून ये-जा करतात. साडेतीन ट्रिलियन डॉलरचा व्यापार आणि दररोज सुमारे अडीच कोटी बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक या मार्गावरून होत असल्याने, जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हा मार्ग किती महत्त्वाचा आहे, हे वेगळे सांगायला नको.

चीनची वाढलेली धाकधूक

चीनच्या तेल आयातीचा ६० ते ८० टक्के हिस्सा याच मार्गावरून येतो. चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांनी या परिस्थितीला 'मलक्का डिलेमा' असे म्हटले होते. जर भविष्यात हा मार्ग कोणत्याही कारणाने बंद झाला, तर चीनची अर्थव्यवस्था कोलमडून पडू शकते. या मार्गाच्या संरचनेचा विचार करता, होर्मुजच्या सामुद्रधुनीपेक्षाही मलक्का अधिक संवेदनशील आहे. होर्मुजचा मार्ग ५५ किमी रुंद असला, तरी मलक्काचा सर्वात अरुंद भाग अवघ्या २.८ किमीचा आहे. येथे थोडासाही अडथळा निर्माण झाला, तर तो जागतिक संकटात रूपांतरित होऊ शकतो.

अमेरिकेची रणनीती काय?

इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अमेरिका आता अशा महत्त्वाच्या 'चोकपॉइंट्स'वर आपली पकड मजबूत करत आहे. 'यूएसएस मिगुएल कीथ'सारखे अद्ययावत जहाज या भागात तैनात करणे, हा चीनला दिलेला एक स्पष्ट इशारा मानला जात आहे. या जहाजावर हेलिकॉप्टर लँडिंगपासून ते सैनिकांच्या वास्तव्यापर्यंत सर्व सोयी आहेत, त्यामुळे हे जहाज युद्धाच्या प्रसंगी एखाद्या फिरत्या तळासारखे काम करू शकते.

जगण्यावर काय परिणाम होईल?

जर मलक्काचा मार्ग बाधित झाला, तर जहाजांना लांबचा प्रवास करावा लागेल. यामुळे वाहतुकीचा खर्च प्रचंड वाढेल आणि त्याचे थेट परिणाम इंधन, इलेक्ट्रॉनिक्स, औषधे आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंच्या किमतींवर होतील. जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यास महागाईचा भडका उडण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या दक्षिण चीन समुद्र, स्वेज कालवा आणि बाब-अल-मंदेब यांसारख्या मार्गांवर आधीच तणाव असताना, मलक्कामध्ये अमेरिकेची सक्रियता जागतिक राजकारणाला एका वेगळ्या वळणावर घेऊन गेली आहे.

Web Title : मलक्का जलडमरूमध्य में तनाव: अमेरिकी उपस्थिति से चीन की बढ़ी चिंता।

Web Summary : मलक्का जलडमरूमध्य, एक महत्वपूर्ण व्यापार मार्ग, में अमेरिकी नौसेना की उपस्थिति से तनाव बढ़ रहा है। तेल आयात के लिए इस मार्ग पर निर्भर चीन को संभावित आर्थिक व्यवधान का सामना करना पड़ रहा है। मार्ग अवरुद्ध होने पर बढ़ी हुई लागत और वैश्विक आपूर्ति श्रृंखला मुद्दे दुनिया भर में मुद्रास्फीति को ट्रिगर कर सकते हैं।

Web Title : Malacca Strait Tension: US Presence Raises Concerns for China's Lifeline.

Web Summary : US naval presence in the Malacca Strait, a vital trade route, is escalating tensions. China, heavily reliant on this passage for oil imports, faces potential economic disruption. Increased costs and global supply chain issues could trigger inflation worldwide if the route is blocked.