Mukesh Ambani: मुकेश अंबानींना आणखी मालामाल करणार हा नवा उद्योग; अमेरिकन फर्मची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 04:54 PM2021-07-20T16:54:47+5:302021-07-20T17:01:02+5:30

Mukesh Ambani will become more rich: मुकेश अंबानी जो देखील व्यवसाय सुरु करतात तो य़शस्वी होणार हे नक्की असते. रिलायन्स जिओ हे ताजे उदाहरण.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे नाव पुढे नेण्यात मुकेश अंबानी (mukesh ambani) यशस्वी ठरले आहेत. रिलायन्स ग्रुपची विभागणी अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्यामध्ये झाली होती. मात्र, अनिल अंबानी यांच्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या, तर मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांनी मोठी झेप घेतली. पेट्रोलियम, टेलिकॉम, रिटेल सारख्या क्षेत्रात मुकेश अंबानींना मोठे यश मिळाले आहे.

मुकेश अंबानी जो देखील व्यवसाय सुरु करतात तो य़शस्वी होणार हे नक्की असते. रिलायन्स जिओ हे ताजे उदाहरण. आता मुकेश अंबानी यांनी ग्रीन एनर्जी सेगमेंटमध्ये (green energy buseiness) उतरण्याची घोषणा केली आहे. यामध्ये त्यांना कितपत यश मिळेल याबाबत भविष्यवाणी होऊ लागली आहे.

अमेरिकेची रिसर्च अँड ब्रोकरेज फर्म बर्नस्टेन रिसर्चने म्हटले आहे की, रिलायन्स इंडस्ट्रीजचा ग्रीन एनर्जी उद्योग पुढील 5 वर्षांत यशाचा नवा पायंडा रचेल. पुढील काळात रिलायन्सच्या या नव्या उद्योगाची व्हॅल्यू वाढून 2.6 लाख कोटी रुपयांवर जाणार आहे.

जर सारे काही योजनेनुसार घडत गेले तर 2026 मध्ये रिलायंस ग्रुपमध्ये ग्रीन एनर्जीचा वाटा हा 10 टक्के होणार आहे, असे भाकित या फर्मने केले आहे.

रिलायंस इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी गेल्या महिन्यात झालेल्या वार्षिक सभेत ग्रीन एनर्जी उद्योग सुरु करण्याची घोषणा केली. यामध्ये रिलायन्स 75 हजार कोटी रुपये गुंतविणार आहे. यापैकी 60 हजार कोटी रुपये हे 4 गीगा फॅक्टरी उभारण्य़ासाठी लागणार आहेत.

या फॅक्टरीमध्ये सोलर, बॅटरी, फ्युअल सेल आणि इलेक्ट्रोलायझरचे उत्पादन केले जाणार आहे. या सर्व फॅक्टरी गुजरातच्या जामनगरमध्ये उभारण्यात येणार आहेत. 2030 पर्यंत 100 गीगावॅट सोलार एनर्जी तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

या रिपोर्टमध्ये रिलायन्सला आव्हानांचा सामना करावा लागणार असल्याचे देखील म्हटले आहे. अनेक तेल कंपन्यांनी क्लीन एनर्जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या सर्व असफल ठरल्या. रिलायन्सचा मॅन्युफॅक्चरिंग वरीचा फोकस वेगळा आहे. यामध्ये जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे.

क्लीन एनर्जीमध्ये लिमिटेड मॅन्युफॅक्चरिंग रिलायन्ससाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. या आव्हानाशी दोन हात करण्यासाठी रिलायन्सला अन्य भागीदार शोधावे लागणार आहेत. हे भागीदार फ्युअल सेल आणि बॅटरी मॅन्युफॅक्टरींगमध्ये मदत करू शकतील.

बर्नस्टेनने म्हटले की, ग्रीन एनर्जी उद्योगाच्या यशावर सध्या जास्त काही सांगता येणार नाही. परंतू कंपनीच्या खास रणनीतीमुळे हा उद्योग यशस्वी होण्याची शक्यता अधिक आहे. कारण रिलायन्सने स्वत: उर्जा उत्पादित करण्याऐवजी याच्याशी संबंधीत उपकरणे बनविण्यावर लक्ष दिले आहे.

ही रणनिती रिलायन्सला सफल बनवू शकते. रिलायन्सने सौर उर्जेमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा सौर पीव्ही पॅनल आणि ग्रीन एनर्जी स्टोरेजच्या उपकरणांच्या उत्पादनाचा विचार केला आहे.

अंबानींनी या व्यवसायात उतरण्याचा विचार असाच केलेला नाहीय, पुढील तीस वर्षांत जगभरातील देश यावर 70 पद्म डॉलर्सपेक्षा जास्त पैसा खर्च करणार आहेत. यापैकी मोठ्या वाट्यावर मुकेश अंबानींनी लक्ष ठेवले आहे.