PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 01:19 IST2026-04-19T01:18:46+5:302026-04-19T01:19:55+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी: विधेयक मंजूर न झाल्याबद्दल मागितली देशातील महिला वर्गाची माफी; काँग्रेस, तृणमूल, द्रमुक सारख्या विरोधी पक्षांनी विधेयकाची भ्रूणहत्या केल्याचा केला आरोप

PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेससारख्या पक्षांच्या स्वार्थी राजकारणाचा फटका देशातील महिलांना बसला. या साऱ्या घटना २१व्या शतकातील महिला पाहात आहेत आणि त्या योग्यवेळी उत्तर देतील अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केली.
महिला आरक्षण रोखून विरोधकांनी त्या वर्गाची स्वप्ने चिरडण्याचे पाप केले आहे आणि त्याची त्यांना शिक्षा नक्कीच मिळेल असेही ते म्हणाले. विधेयक मंजूर न होऊ शकल्याबद्दल मोदी यांनी देशातील महिलांची माफी मागितली. लोकसभेत शुक्रवारी महिला आरक्षणाशी संबंधित संविधान (१३१वा दुरुस्ती) विधेयक मंजूर होऊ शकले नाही. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी शनिवारी रात्री दूरचित्रवाहिनीवरून जनतेला उद्देशून भाषण केले. ते म्हणाले की, विरोधकांनी महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक नाकारून संविधान निर्मात्यांच्याही भावना दुखावल्या आहेत.
काँग्रेस हा सुधारणाविरोधी पक्ष असल्याची टीका
पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस अनेक राज्यांत आपला प्रभाव गमावून बसली आहे आणि इतर पक्षांच्या आधारावर टिकून आहे.
विधेयक संमत होण्यास काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षांनी खोडा घातला. यातून काँग्रेस सुधारणाविरोधी पक्ष असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. २१व्या शतकातील भारताच्या निर्मितीसाठी आवश्यक निर्णय काँग्रेस सतत नाकारत आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील पाच महत्त्वाचे मुद्दे
- भारताची नारीशक्तीला उंच भरारी घेण्यापासून काही जणांनी रोखले, तिची स्वप्ने पायदळी तुडविली.
- विरोधकांनी महिलांचे हक्क हिरावून घेत असताना लोकसभेतील बाके वाजवत आनंद व्यक्त केला.
- विरोधकांचे बाके वाजवणे हा महिलांच्या स्वाभिमानावर आघात होता. महिला सर्व काही विसरते; पण अपमान विसरत नाही.
- महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून विरोधकांनी पाप केले आहे आणि त्यांना त्याची शिक्षा नक्कीच मिळेल.
- घराणेशाहीचे राजकारण करणाऱ्या पक्षांना महिलांच्या सशक्तीकरणाची भीती वाटते. म्हणूनच त्यांनी या विधेयकाला विरोध केला.
‘सत्ता असलेल्या राज्यांनाच विरोधकांनी धोका दिला’
पंतप्रधान म्हणाले की, महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असते तर प. बंगाल, केरळ, उत्तर प्रदेश यासह सर्व राज्यांतील लोकसभा जागा वाढल्या असत्या; परंतु विरोधकांनी आपल्या राज्यांनाच धोका दिला. द्रमुककडे अधिक लोकांना खासदार, आमदार बनवण्याची संधी होती; परंतु त्यांनी ती गमावली. तृणमूल काँग्रेसनेही बंगालच्या लोकांना पुढे नेण्याची संधी वाया घालवली.
‘महिलांच्या स्वाभिमानावर विरोधकांचा आघात’
पंतप्रधान म्हणाले की, संसदेत विरोधक महिलांचे हक्क हिरावून घेत असताना बाके वाजवत होते. हे कृत्य महिलांच्या स्वाभिमानावर आघात करणारे होते. महिला सर्व काही विसरते; पण अपमान कधीही विसरत नाही. माझ्यासाठी देशहिताला सर्वोच्च प्राधान्य आहे, पण काहींसाठी पक्षहित मोठे आहे.