Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 01:35 IST2026-04-19T01:34:06+5:302026-04-19T01:35:06+5:30
Hormuz Strait: इराणच्या नौदलाने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या दोन भारतीय जहाजांवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली.

Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध
नवी दिल्ली/तेहरान/कैरो: अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीत केलेली नाकेबंदी उठवण्यास नकार दिल्यानंतर शनिवारी इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद करत या जलमार्गावर कडक निर्बंध लादले आहेत. या तणावपूर्ण वातावरणात इराणच्या नौदलाने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या दोन भारतीय जहाजांवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली.
भारताचे मालवाहतूक जहाज 'जग अर्णव' व तेलवाहू जहाज 'सनमार हेराल्ड' हे ओमानच्या ईशान्येला २५ सागरी मैलावर असताना या इराणच्या 'रिव्होल्युशनरी गार्ड्स'ने 'या जहाजांना मार्ग बदलण्यास सांगितले. त्यादरम्यान जहाजावर गोळीबार झाल्याची शक्यता आहे.या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण या गंभीर घटनेची दखल घेत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणचे राजदूत डॉ. मोहम्मद फताली यांना तातडीने समन्स बजावले. 'सनमार हेराल्ड' इराककडून २० लाख बॅरल तेल घेऊन भारताकडे येत होते.
घटना कशी घडली?
'जग अर्णव' आणि 'सनमार हेराल्ड' या दोन जहाजांना इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने प्रवेश नाकारला आणि त्यांना आपले मार्ग बदलण्याचे आदेश दिले. 'मरीन ट्रॅफिक'च्या ट्रॅकिंग डेटानुसार, ही जहाजे ठरलेल्या मार्गावरून जात असताना लारक बेटाजवळ त्यांचा वेग मंदावला आणि त्यानंतर त्यांनी 'यू-टर्न' घेतला. त्यानंतर ही जहाजे ओमानच्या ईशान्येला २५ सागरी मैल समुद्रात असताना त्यांच्यावर इराणच्या गन बोटीतून गोळीबार झाला. 'सनमार हेराल्ड'ची खोली २१ मीटर आहे. याचा अर्थ हा टँकर तेलाने पूर्णपणे भरलेला आहे. ब्रिटन लष्कराने (यूकेएमटीओ) टँकरवर गोळीबार झाल्याचे सांगितले.